सामने जिंकण्यासाठी अधिक गोल आवश्यक!

Mumbai
गुरप्रीत संधूचे मत

भारताच्या फुटबॉल संघाने मागील काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र, त्यांना २०२२ फिफा विश्वचषक पात्रतेच्या दुसर्‍या फेरीत चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. आशियाई विजेत्या कतारला गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर बांगलादेशविरुद्ध त्यांना केवळ १-१ अशी बरोबरी करता आली. भारतीय संघ सध्या कोणत्याही संघाला झुंज देऊ शकत असला, तरी महत्त्वाचे सामने जिंकण्यासाठी आम्ही अधिक गोल करणे गरजेचे आहे, असे मत भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने व्यक्त केले.

मागील काही वर्षांत आम्ही आमच्या खेळात खूप सुधारणा केली आहे. त्यामुळे आमच्या संघाला पराभूत करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला मेहनत घ्यावी लागते. मात्र, आम्हाला महत्त्वाचे सामने जिंकायचे असतील, तर आम्ही अधिक गोल मारणे गरजेचे आहे. आमच्या संघात प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही, असे गुरप्रीत म्हणाला.

भारत आता अफगाणिस्तान आणि ओमान या संघांविरुद्ध सामने खेळणार आहे. त्याविषयी गुरप्रीतने सांगितले, दोन्ही सामने आव्हानात्मक असतील. ओमानचा संघ चांगला आहे. तसेच अफगाणिस्तानला पराभूत करणे सोपे नसेल. मात्र, या दोन्ही सामन्यांत गुण मिळवण्याच्या उद्देशानेच आम्हाला मैदानात उतरावे लागेल.