करोनामुळे खेळही बंद झाले याचे दुःख – स्टेन

Mumbai
स्टेन

करोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान प्रीमियर लीग (पीएसएल) स्पर्धेचे अखेरचे काही सामने पुढे ढकलण्यात आले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन या स्पर्धेमध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करत होता. पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडल्यानंतर परदेशी खेळाडूंनी आपापल्या देशांमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. मायदेशी परतल्यानंतर त्यांना विलगीकरणात राहावे लागत आहे. करोनाचा फटका खेळांनाही बसल्याचे मला दुःख आहे, असे मत डेल स्टेनने व्यक्त केले.

करोनामुळे सर्वकाही बंद झाले याचे दुःख आहे. दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात आम्हाला याआधी संस्कृती, धर्म, वंश अशा बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र, खेळ ही एक अशी गोष्ट आहे, जी आमच्या देशात सगळ्यांना एकत्र आणते. कोणत्या गोष्टी लोकांना एकत्र आणू शकतात याचा दक्षिण आफ्रिकेत आम्ही विचारच करत असतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये खेळ सुरु नाहीत आणि अशावेळी आम्हाला एकत्र येण्यासाठी जणू दुसरा पर्याय नाही. खेळांमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद आहे, असे नेल्सन मंडेला म्हणाले होते. तुम्ही आता खेळ काढून घेतले, तर आमच्याकडे काय शिल्लक राहते असा मला प्रश्न पडतो, असे स्टेन म्हणाला.

क्रिकेटच्या व्यग्र कार्यक्रमामुळे खेळाडूंना फारसा रिकामा वेळ मिळत नाही. परंतु, सध्या स्टेनला घरातच बसून राहावे लागत आहे. याबाबत त्याने सांगितले, सध्या सगळीकडे केवळ करोनावरच चर्चा होत आहे. प्रत्येक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर करोनाबाबतच चर्चा असते. सुट्टीवर असताना मी मासे पकडण्यासाठी वैगरे जातो. मात्र, सध्या मला घरी बसून राहावे लागत आहे.

तसेच त्याने पीएसएल स्पर्धेबाबत सांगितले, आम्हाला सध्या जणू हॉटेलमध्ये डांबून ठेवले होते. तुम्ही बाहेर पडू शकत नाही असे आम्हाला सांगण्यात आले आणि हे योग्यच होते. मला नियम मोडायचे नव्हते. माझ्या चुकीमुळे पाकिस्तानमधील क्रिकेट पुन्हा बंद होणे मला चालले नसते.

विलगीकरणात डी कॉकसोबत राहायला आवडेल!
मला विलगीकरणात क्विंटन डी कॉकसोबत राहायला आवडेल. तो माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तींपैकी एक आहे. तुम्ही त्याच्या हॉटेल रूममध्ये गेलात तर तो मासे पकडण्यासाठी तयारी करत असतो किंवा मासे कसे पकडतात याचे व्हिडीओ बघत असतो किंवा जेवण कसे बनवायचे याचे व्हिडीओ बघत असतो. मला जेवण बनवायला आवडत नाही. त्याच्याबरोबर राहिल्यास मला जेवण बनवावे लागणार नाही, पण मी त्याला मदत नक्कीच करेन. तसेच मी त्याच्यासोबत मासे पकडण्याचे व्हिडीओ बघू शकतो, असे डेल स्टेनने नमूद केले.