श्रेयसच चौथ्या क्रमांकासाठी योग्य!

Mumbai
Sunil gavaskar
सुनील गावस्करचे मत

श्रेयस अय्यरला भारतीय एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकावर संधी मिळाली पाहिजे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. मुंबईकर युवा फलंदाज अय्यरची जवळपास एका वर्षाने भारतीय संघात निवड झाली आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात संघ अडचणीत असताना ६८ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. मात्र, त्याने ही खेळी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केली, तर रिषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. परंतु, चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पंतपेक्षा अय्यर योग्य पर्याय आहे, असे गावस्कर यांना वाटते.

धोनीप्रमाणेच पंतला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायला हवे. या क्रमांकावर खेळताना तो आपला नैसर्गिक खेळ करत फिनिशरची भूमिका बजावू शकेल. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि ते ४०-४५ षटकांपर्यंत खेळले, तर पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणे योग्य आहे. मात्र, जर ३०-३५ षटके शिल्लक असतील, तर चौथ्या क्रमांकावर अय्यरने फलंदाजी करायला हवी, असे गावस्कर म्हणाले.

तसेच पुढे त्यांनी अय्यरविषयी सांगितले, अय्यरने संधीचे सोने केले. तो फलंदाजीला आला तेव्हा बरीच षटके शिल्लक होती आणि त्याला विराट कोहलीसोबत फलंदाजी करण्याची संधी मिळाली. विराटसारखा फलंदाज दुसर्‍या बाजूला खेळत असल्यामुळे त्याला बरेच शिकायला मिळाले असेल.

सातत्याने संधी मिळू दे! -अय्यर

 युवा फलंदाज श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात ७१ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे अर्धशतक होते. याआधी ६ सामन्यांत २ अर्धशतके करूनही श्रेयसला एक वर्ष भारतीय संघातून बाहेर राहावे लागले. मात्र, आता सातत्याने संधी मिळत राहील अशी अय्यरला आशा आहे. याबाबत तो म्हणाला, मला संघामध्ये काही काळ कायम राहायचे आहे. सातत्याने संधी मिळत राहणे खूप आवश्यक आहे. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. भारतीय संघासाठी योगदान द्यायचे आहे. या सामन्यात मी महत्त्वाची खेळी केली याचा आनंद आहे. मी भारत ’अ’ संघाकडून या मैदानांवर खेळलो आहे आणि त्यामुळे मी या मालिकेत दमदार कामगिरी करू शकेन याची मला खात्री होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here