घरक्रीडानम्रपणा म्हणजे कमकुवतपणा नाही!

नम्रपणा म्हणजे कमकुवतपणा नाही!

Subscribe

गांगुली कर्णधार होण्याआधी भारतीय संघातील खेळाडू नम्र नक्कीच होते, पण त्यांचा नम्रपणा म्हणजे कमकुवतपणा नव्हता, अशा शब्दांत सुनील गावस्कर यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनला सुनावले. 

सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाला कणखर बनवले. गांगुली कर्णधार होण्याआधी भारताकडे खूप प्रतिभावान खेळाडू होते. परंतु, हे खेळाडू खूप साधे आणि नम्र होते. ते सकाळी तुम्हाला भेटल्यावर शुभेच्छा द्यायचे. मात्र, गांगुली कर्णधार झाल्यावर हे चित्र बदलले, असे काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन म्हणाला होता. हुसेनचे हे वक्तव्य भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना फारसे आवडलेले नाही. गांगुली कर्णधार होण्याआधी भारतीय संघातील खेळाडू नम्र नक्कीच होते, पण त्यांचा नम्रपणा म्हणजे कमकुवतपणा नव्हता, अशा शब्दांत गावस्कर यांनी हुसेनला सुनावले.

तेंडुलकर, द्रविड कणखर नव्हते का?

आधीच्या भारतीय संघातील खेळाडू नम्र होते. सकाळी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना शुभेच्छा द्यायचे. त्यांच्यासोबत हसायचे, असे नासिर म्हणाला होता. नम्रपणे वागता म्हणजे तुम्ही कमकुवत आहात आणि तुम्ही जर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी हुज्जत घालत असाल, त्यांना प्रत्युत्तर देत असाल तर तुम्ही निडर आहात, कणखर आहात असा समज आहे. मात्र, हे खरेच योग्य आहे का? सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, लक्ष्मण, अनिल कुंबळे, हरभजन सिंग हे खेळाडू कणखर नव्हते असे नासिरला म्हणायचे आहे का? हे खेळाडू शिवीगाळ करत नव्हते, हुज्जत घालत नव्हते, उगाचच ओरडत नव्हते म्हणजे ते कमकुवत होते का?, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisement -

नासिरला काय माहित आहे?

गांगुलीची २००० मध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. परंतु, त्याआधी भारतीय क्रिकेटला खूप मोठा इतिहास आहे आणि याबाबत नासिरला किती माहिती आहे, असा प्रश्न गावस्कर यांनी उपस्थित केला. नासिरला ८०, ९० च्या दशकातील भारतीय संघांबाबत काय माहित आहे? हे संघ भारतात तर जिंकतच होते, पण परदेशातही चांगली कामगिरी करायचे. गांगुली हा उत्कृष्ट कर्णधार होता यात वाद नाही. भारतीय क्रिकेटचा कठीण काळ सुरु असताना गांगुलीने नेतृत्वातची धुरा सांभाळली आणि या संघाला वेगळ्या उंचीवर नेले. मात्र, त्याच्या आधीचे भारतीय संघ कमकुवत होते असे म्हणणे मूर्खपणाचे आहे, असे गावस्कर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -