नॅपोलीची गतविजेत्या लिव्हरपूलवर मात

युएफा चॅम्पियन्स लीग

Mumbai

गतविजेत्या लिव्हरपूलला युएफा चॅम्पियन्स लीगच्या नव्या मोसमाची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले. ड्रिस मर्टेन्स आणि फर्नांडो लॉरेंटे यांनी केलेल्या गोलच्या जोरावर इटालियन संघ नॅपोलीने पहिल्या साखळी सामन्यात लिव्हरपूलचा २-० असा पराभव केला. मागील मोसमात लिव्हरपूलने केलेल्या पराभवामुळे नॅपोलीची बाद फेरी गाठण्याची संधी हुकली होती. परंतु, यावेळी नॅपोलीने सामना जिंकण्यात चूक केली नाही. चॅम्पियन्स लीगमध्ये गतविजेत्या संघाची पहिल्या साखळी सामन्यात पराभूत होण्याची १९९४ नंतर (एसी मिलान) पहिलीच वेळ होती.

गट इमधील या सामन्याची दोन्ही संघानी सावध सुरुवात केली. सामन्याच्या सातव्या मिनिटाला हरवींग लॉझानोने गोल केला, पण तो ऑफसाईड असल्यामुळे गोल रद्द करण्यात आला. यानंतर दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती. मध्यंतरानंतर या सामन्यात रंगत आली. सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला मर्टेन्सने मारलेला फटका लिव्हरपूलचा गोलरक्षक अ‍ॅड्रीयानने अप्रतिमरीत्या अडवला. यानंतर मो सलाहचा फटका नॅपोलीचा गोलरक्षक मेरेतने अडवला. मात्र, दोन्ही संघांनी आक्रमक खेळ सुरु ठेवला.

सामन्याच्या ८० व्या मिनिटाला आंद्रे रॉबर्टसनने जोसे कॅलेहॉनला पेनल्टी बॉक्समध्ये अयोग्यरीत्या पाडल्याने नॅपोलीला पेनल्टी मिळाली. यावर मर्टेन्सने गोल करत नॅपोलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ९० मिनिटांनंतरच्या अतिरिक्त वेळेत अनुभवी स्ट्रायकर फर्नांडो लॉरेंटेने नॅपोलीची आघाडी दुप्पट केली. पुढे लिव्हरपूलला गोल करण्याची संधी मिळाली नाही आणि नॅपोलीने हा सामना २-० असा जिंकला. याच गटातील दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रियन संघ रेड बुल साल्झबर्गने बेल्जियन संघ गेंकचा ६-२ असा धुव्वा उडवला.

चेल्सीचा पराभव

इंग्लिश संघ चेल्सीला युएफा चॅम्पियन्स लीगच्या नव्या मोसमातील पहिल्या साखळी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गट एचमध्ये त्यांना वेलंसियाने १-० असे पराभूत केले. वेलंसियाकडून रॉड्रिगोने ७४ व्या मिनिटाला गोल केला. या सामन्याच्या ८७ व्या मिनिटाला चेल्सीला पेनल्टी मिळाली, पण रॉस बार्कलीला त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. या गटातील दुसर्‍या सामन्यात आयेक्सने लीलवर ३-० अशी मात केली.

सामन्यांचे निकाल

इंटर १-१ स्लाव्हिया प्राग
डॉर्टमंड ०-० बार्सिलोना
लियॉन १-१ झेनित
बेनफिका १-२ लेपझिंग
चेल्सी ०-१ वेलंसिया
आयेक्स ३-० लील
साल्झबर्ग ६-२ गेंक
नॅपोली २-० लिव्हरपूल