घरक्रीडाVijay Hazare Trophy 2018 : मुंबईची अंतिम फेरीत धडक

Vijay Hazare Trophy 2018 : मुंबईची अंतिम फेरीत धडक

Subscribe

विजय हजारे चषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

तुषार देशपांडेच्या तीन विकेट तसेच श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉची यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने हैदराबादचा ६० धावांनी पराभव करत विजय हजारे चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. हैदराबादने दिलेल्या २४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पावसामुळे २५ व्या षटकात जेव्हा सामना थांबवण्यात आला तेव्हा मुंबईची धावसंख्या २ बाद १५५ अशी होती. पण व्हीजेडी मेथडनुसार २५ षटकांनंतर मुंबईला ९६ धावांचे आव्हान होते. त्यामुळे मुंबईने हा सामना ६० धावांनी जिंकला.

रोहित रायडूचे शतक

या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईचा गोलंदाज तुषार देशपांडेने हैदराबादचे सलामीवीर अगरवाल आणि रेड्डी यांना अवघ्या २६ धावांत माघारी परतले. यानंतर रोहित रायडू आणि संदीप यांनी हैद्राबादचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. संदीप २९ धावा करून बाद झाला. यानंतर इतर फलंदाजांना फारसे चांगले प्रदर्शन करता आले नाही. पण रोहित रायडूने अप्रतिम फलंदाजी करत शतक झळकावले. त्याच्या नाबाद १२१ धावांमुळे हैदराबादने आपल्या ५० षटकांत ८ बाद २४६ धावांचा टप्पा गाठला.

पृथ्वी आणि कर्णधार अय्यरची आक्रमक फलंदाजी 

२४७ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉने आक्रमक सुरुवात केली. त्याला रोहित शर्माने चांगली साथ दिली. त्यामुळे मुंबईने ९ षटकांतच ७३ धावा फलकावर लावल्या. यानंतर रोहित बाद झाला. तर अवघ्या ४४ चेंडूंत ६१ धावा करणारा पृथ्वी १२ व्या षटकात बाद झाला. त्यावेळी मुंबईची धावसंख्या ८२ होती. पुढे अय्यर आणि रहाणे यांनी चांगली फलंदाजी केली. अय्यरने ५३ चेंडूंत ५५ धावा केल्या. २५ षटकांनंतर जेव्हा पावसाच्या व्यत्ययाने सामना थांबला तेव्हा व्हीजेडी मेथडनुसार मुंबईला सामना जिंकण्यासाठी ९६ धावांवर असणे गरजेचे होते. मुंबई १५५ धावांवर असल्याने मुंबईने हा सामना ६० धावांनी जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -