चहल क्विंटन डिकॉकला म्हणतो, ‘भाई आपसे ना हो पायेगा’!

भारतीय स्पीनर युजवेंद्र चहलनं दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर क्विंटन डीकॉकला एक सल्ला दिला आणि नेटिझन्समध्ये तुफान धम्माल सुरू झाली!

Mumbai

विश्वचषक आणि त्यानंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय स्पीन गोलंदाजीची धुरा सांभाळणारा बॉलर युजवेंद्र चहल हा सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हरयाणासाठी खेळत आहे. मात्र, असं असलं, तरी त्याचं सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये सुरू असलेल्या टेस्ट मॅचवर चांगलंच बारीक लक्ष आहे. भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने पहिल्या टेस्ट मॅचच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावल्यानंतर त्याने लगेच रोहीत शर्माचं ट्वीटरवर अभिनंदन केलं होतं. मात्र, आता क्विंटन डिकॉकवर त्यानं केलेलं ट्वीट आणि त्या ट्वीटसोबत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं चहल मैदानावर नसला, तरी ट्वीटरवरून धम्माल मनोरंजन करतोय!

हे ट्वीट आहे युजवेंद्र चहलच्या ग्राऊंडवरच आराम करतानाच्या एका फोटोबद्दल. कधीही मैदानाच युजवेंद्र चहल निवांत असला, की तो मैदानावर अर्धा रेलून आणि मागे टेकून आरामात बसलेला तुम्हाला दिसेल. ही त्याची नेहमीची पोज!

yuzvendra chahal
युजवेंद्र चहल

आता पाहुयात युजवेंद्रनं दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्विंटन डिकॉकला काय सांगितलं आहे ट्वीटरवर ते! दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यामध्ये चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राचा खेळ सुरू असताना मध्येच खेळ थांबला तेव्हा क्विंटन डीकॉक मैदानावर रेलून झोपलेला दिसला. आणि तो जवळपास चहलसारखाच झोपला होता. युजवेंद्र चहलनं हाच धागा पकडत डीकॉकला उपहासाने म्हटलं, ‘क्विनी भाई, आपसे ना हो पायेगा!’ यासाठी चहलनं यावर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या दोघांवरच्या मीमचा फोटो देखील ट्वीटरवर शेअर केला आहे!

युजवेंद्रनं हे ट्वीट केल्यानंतर त्यावर त्याच्या चाहत्यांच्या तुफान प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत!