शरद पवारांची अवस्था ‘शोले’तील ‘जेलर’साखी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चिमटे

Mumbai
cm devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस

आज निवडणूक समोर आहे, मात्र आमच्या समोर विरोधकच नाहीत. लहान मुलाला विचारले तर तोही सांगतो की महायुतीचे सरकार येणार. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, माती लावून तयार आहेत आखाड्यात उतरले आहेत. मात्र प्रतिस्पर्धी पक्षाचे पैलवान आखाड्यात उतरायलाच तयार नाहीत. राहुल गांधींना ठाऊक आहे की निवडणूक काँग्रेस हरणार आहे त्यामुळे ते बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत. तर शरद पवारांची अवस्था शोले सिनेमातल्या जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ बाकी बचे मेरे पिछे आओ असे शरद पवार म्हणत आहेत, मात्र प्रत्यक्षात त्यांच्यामागे कुणीही नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. फलटण या ठिकाणी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर घणाघाती टीका केली.

सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे म्हणाले आता आम्ही फार थकलो आहोत, आमच्याने आता काहीही होत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण आपण करू. सुशीलकुमार शिंदे हे द्रष्टे नेते आहेत. त्यांना निवडणुकीनंतर काय होणार आहे ते समजले आहे,असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अशी होणार की विरोधी पक्ष नेताही त्यांना निवडता येणार नाही. कारण विरोधी पक्ष नेता निवडायचा असेल तर १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळवाव्या लागतात. पण तेवढ्याही जागा मिळणार नाहीत ही खात्री पटल्यानेच सुशीलकुमार शिंदे विलीनीकरणाची भाषा करत आहेत असाही टोला फडणवीस यांनी लगावला.