घरमहाराष्ट्रकाँग्रेसचं अखेर ठरलं, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष काम करणार

काँग्रेसचं अखेर ठरलं, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष काम करणार

Subscribe

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आपापला वेळ घेत व्यापक चर्चा केल्यानंतर सत्ता स्थापन करतील, अशी चिन्ह दिसत आहेत. सत्तेच्या वाटपात शिवसेना आणि राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद मिळेल, अशा फॉर्म्युल्याची चर्चा होत होती. मात्र काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल (दि. १२ नोव्हेंबर) रात्री उशीरा भेट घेऊन काँग्रेस शिवसेनेच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये काम करणार असल्याची खात्री दिली. त्यानंतर आज राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष काम करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच शिवसेना संपुर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री पद स्वतःकडेच ठेवणार असे चित्र दिसत आहे.

शिवसेनेसोबत सत्तेत जावे की नाही? या संभ्रमात असलेल्या काँग्रेसने आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष काम करण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळावे, यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखण्यात येत होती. मात्र काँग्रेसने घेतलेल्या पावित्र्यामुळे शिवसेनेला नवे बळ मिळाले आहे. त्यामुळेच आज काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक संपल्यानंतर “आमची चर्चा योग्य दिशेने सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली.

- Advertisement -

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यपालांनी दिलेल्या निहित वेळेत बहुमत सिद्ध करु शकले नाहीत. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तत्पूर्वी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत एनडीएतून शिवसेना बाहेर पडल्याचे संकेत दिले होते. शिवसेनेचे महायुतीमधील परतीचे दोर कापले गेल्याचे दिसताच राष्ट्रवादीकडून अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी चर्चा सुरु करण्यात आली. शिवसेनेसमोर पर्याय नसल्यामुळे राष्ट्रवादीची मागणी मान्य होईल, असे वाटत असतानाच काँग्रेसने पाच वर्ष शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष काम करण्यास होकार दिल्यामुळे मुख्यमंत्रीपद वगळता इतर खात्यांचे समसमान वाटप होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच संजय राऊतांचा पुनरुच्चार

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी भाजपसोबत एकटे भिडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता बाहेर आले आहेत. बाहेर येताच त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे निक्षुण सांगितले आहे. तीनही पक्षांचा समान कृती कार्यक्रम ठरण्यासाठी थोडा वेळ लागणार आहेच, मात्र आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

aapla mahanagar news
आपलं महानगरची बातमी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -