घरमुंबईउत्तर मुंबईत शेट्टींना आव्हान देण्यासाठीच राणेंना उमेदवारी

उत्तर मुंबईत शेट्टींना आव्हान देण्यासाठीच राणेंना उमेदवारी

Subscribe

उत्तर मुंबईत आपल्याला कोणीही आव्हान देवू नये म्हणून भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी हे स्थानिक नेतृत्वाला उभारी देत नसल्याची चर्चा पुन्हा एकदा बोरीवलीतील सुनील राणे यांच्या उमेदवारीवरून रंगू लागली आहे. एकमेव योगेश सागर वगळता अन्य पाचही विधानसभा मतदार संघात भाजपचे नेतृत्व तयार केले जात नाही. त्यामुळे विनोद तावडे यांचा पत्ता कापताना मुख्यमंत्र्यांनीही आपल्या मर्जीतील सुनील राणे यांना उमेदवारी देतानाच अप्रत्यक्ष उत्तर मुंबईत शेट्टी यांच्यासमोर नवे नेतृत्व तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बोरीवली हा मतदार संघ भाजपच्या पडेल नेत्यांच्या पुनर्वसनाचा मतदार संघ आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बोरीवलीचे आमदार व माजी मंत्री विनोद तावडे यांना तिसर्‍या यादीमध्ये स्थान न देता त्यांचा पत्ता भाजपने कापला. मात्र, तावडे यांच्या जागी माजी राज्यपाल राम नाईक यांची मुलगी, प्रविण दरेकर,प्रविण शहा आणि विनोद शेलार यांच्यापैंकी कुणाला उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात असताना, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि वरळीत राहणारे सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदार संघातून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी हे आमदार म्हणून निवडून येत. परंतु ते खासदार झाल्यानंतर या मतदार संघातून विलेपार्ले येथे राहणार्‍या विनोद तावडे यांना भाजपने उमेदवारी दिली होती.

- Advertisement -

परंतु यावेळी तावडेंचा पत्ता कापताना, वरळीतून आयात करत सुनील राणेंना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाजपात प्रचंड असंतोष खदखदत असून या राणे यांच्याविरोधात भाजपचे बोरीवली विधानसभा अध्यक्ष दिपक पाटणेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. पाटणेकर यांच्यासह कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांच्यासह गोपाळ शेट्टींनी केला. परंतु, त्यानंतरही त्यांनी आपल्या भावना तीव्र असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज भरला.

बोरीवलीचे आमदार असतानाही गोपाळ शेट्टी यांनी सर्व मतदार संघात आपली पकड ठेवली होती. त्यामुळे स्थानिक नेतृत्व तयार झाल्यास आपल्याला आव्हान ठरेल म्हणून त्यांनी बाहेरुन आयात करत आजवर उमेदवारीचे वाटप केले आहे. त्यामुळेच मालाडमधून ब्रिजेशसिंह आणि शाम अगरवाल यांचे पत्ते कापत कांदिवली पूर्वला राहणार्‍या रमेशसिंह ठाकूर यांनाच उमेदवारी बहाल करून टाकली. यांच्याबरोबरच शेट्टी यांनी तावडेंचेही महत्व कमी केले. तावडे यांनी काही दिवसांपूर्वीच अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने मोठे उद्यान तथा स्मारक तयार केले आहे.

- Advertisement -

याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडले होते. त्यामुळे तावडेंनी एवढी फिल्डींग लावल्यानंतर त्यांचे महत्व न वाढवता त्यांचे पत्ते कापण्याची रणनिती भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यातच तावडे हे मुख्यमंत्र्यांच्या नावडत्या यादीतील असल्याने, त्यांचा पत्ता कापतानाच भविष्यात खासदार शेट्टी यांना आव्हान देत स्थानिक नेतृत्व तयार करण्यासाठीच राणे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे आमदार व उमेदवार कुठे राहणारे

दहिसर- मनिषा चौधरी, मूळ विभाग-पालघर
बोरीवली- सुनील राणे, राहणार-वरळी
कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर-गोरेगाव
मालाड पश्चिम- रमेशसिंह ठाकूर- कांदिवली, पूर्व
चारकोप- योगेश सागर-स्थानिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -