घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात नऊ जागांवर दावेदारी

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात नऊ जागांवर दावेदारी

Subscribe

पक्षाने मागवला गोपनीय अहवाल; बैठकीत खलबते

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांकडून मागवलेल्या अर्जांबाबत पक्षांतर्गत गोपनीय अहवाल मागवण्यात आला. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अंतर्गत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पंधरा पैकी नऊ जागांवर पक्षाने दावा सांगितला आहे. या मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. यात शहरातील चारपैकी तीन जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी काँग्रेसकडे करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेस, राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही काँग्रेसने राज्यातील सर्व मतदारसंघांतून इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. राष्ट्रवादीकडून हे अर्ज पक्षाकडे पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकार्‍यांमार्फत एक गोपनीय सर्व्हे करून खरोखर कोणत्या जागांवर प्रबळ उमेदवार आहेत, याचा अहवाल मागवण्यात आला. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत नाशिकच्या जागांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. यात नाशिक शहरातील चारपैकी तीन जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. यात नाशिक मध्य, पश्चिम आणि देवळाली मतदारसंघ लढवण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघात दोन्ही पक्षांत चुरस निर्माण झाली आहे. मध्यमधून काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, डॉ. शोभा बच्छाव, तर राष्ट्रवादीकडून गजानन शेलार, विश्वास ठाकूर, देविदास पिंगळे हे इच्छुक आहेत. पूर्व मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. या मतदारसंघात मनसेचे राहुल ढिकले यांनी तयारी केली आहे.

- Advertisement -

मनसेला आघाडीत घेतल्यास या जागेवर फायदा होऊ शकतो, असाही अंदाज पक्षांतर्गत वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार पूर्वची जागा मनसेसाठी सोडण्याची दाट शक्यता आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नांदगाव, येवला, बागलाण, दिंडोरी, निफाड या जागा राष्ट्रवादीने मागितल्या आहेत. यापैकी निफाड वगळता नांदगाव, येवला, बागलाणच्या जागेवर राष्ट्रवादीचे आमदार आहेत. येवला मतदारसंघात छगन भुजबळांना पक्षांतर्गत आव्हान दिले गेले, तर नांदगाव मतदारसंघात पंकज भुजबळ यांना युतीकडून आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे भुजबळांना ही जागा राखताना मोठी कसरत करावी लागणार आहे असे दिसतेय. निफाडमध्ये शिवसेना आमदार अनिल कदम यांनी दोन वेळा वर्चस्व राखले आहे. त्यांची लढत यंदा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांच्याशी होण्याची शक्यता आहे. बागलाणमध्ये आमदार दीपिका चव्हाण यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. दिंडोरीत राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचा दावा प्रबळ मानला जात असला तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले धनराज महाले यांच्याही नावाची चर्चा आहे. महाले यांची राजकीय सोय म्हणून त्यांनाही ऐनवेळी उमेदवारी दिली जाऊ शकते, असा कयास आहे. कळवण सुरगाणा या आदिवासी मतदारसंघात ‘माकप’ आघाडीसोबत गेला तर आमदार जे.पी.गावित हेच उमेदवार असतील. इगतपुरी मतदारसंघात तुर्त काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांच्याशिवाय पर्याय दिसत नाही. सिन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ इच्छुक आहेत. मात्र, ही जागा काँग्रेसला सोडण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या मतदारसंघात अ‍ॅड. माणिकराव कोकाटे ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवारी करू शकतात.

कोकाटे यांनी २००९ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी भाजपकडून उमेदवारी केली. मात्र, त्यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत कोकाटे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. कोकाटे सध्या कोणत्याच पक्षात नाही. त्यामुळे वाजेंचा सामना करण्यासाठी कोकाटेंचे नाव पुढे येऊ शकते. मालेगाव मध्य काँग्रेसला सोडण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या मतदारसंघात आसिफ शेख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात येणार आहे. या जागेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे इच्छुक आहेत. सेनेचा अभेद्य किल्ला असलेल्या देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे. लक्ष्मण मंडाले, दीपक वाघ यांच्यासह तहसीलदार डॉ. राजश्री आहिरराव यांनीही तयारी सुरू केली आहे. आहिरराव यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. या सर्व जागांबाबत चर्चा करण्यात येऊन उमेदवारी कोणाला द्यावी यावरही चर्चा करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत ठेवून चर्चा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या ठिकाणी पेच

चांदवड मतदारसंघात काँग्रेसकडून माजी आमदार शिरीष कोतवाल तर राष्ट्रवादीकडून सयाची गायकवाड इच्छुक आहेत; परंतु इतर पक्षातूनही काही इच्छुक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास इच्छुक असून ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. नाशिक मध्यमध्ये काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. शहरात एकही मतदारसंघ न मिळाल्यास काँग्रेसच्या शहरातील अस्तित्वच संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या जागेवर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अ‍ॅड. माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशीही एक चर्चा मध्यंतरी होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या हालचालींप्रमाणे कोकाटेंना काँग्रेसचे तिकीट देण्याचीही तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीत नेतृत्वावरून स्पर्धा निर्माण होऊ नये म्हणून या पक्षाकडूनच ही चाल खेळली जात असल्याचे बोलले जाते.

असे आहे आघाडीतील संभाव्य जागा वाटप (पक्ष)

नाशिक पूर्व (मनसे), नाशिक पश्चिम (राष्ट्रवादी), नाशिक मध्य (राष्ट्रवादी), देवळाली (राष्ट्रवादी), नांदगाव (राष्ट्रवादी), येवला (राष्ट्रवादी), बागलाण (राष्ट्रवादी), दिंडोरी (राष्ट्रवादी), मालेगाव (काँग्रेस), सिन्नर (काँग्रेस), सुरगाणा (माकप), इगतपुरी (काँग्रेस), चांदवड (राष्ट्रवादी), निफाड (राष्ट्रवादी), मालेगाव बाह्य (काँग्रेस), मालेगाव मध्य (काँग्रेस).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -