घरमहाराष्ट्रशिवसेनाप्रमुख राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत

शिवसेनाप्रमुख राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत

Subscribe

जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याचा ठराव मंजूर

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आता राष्ट्रीय पुरुष आणि नेत्यांच्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. शिवसेनाप्रमुखांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्याचा प्रस्तावाला महापालिकेने मंजुरी दिली असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ४६ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत कोणतीही निवडणूक लढवली नाही. कोणतेही राजकीय पद स्विकारले नाही. मराठी माणसांच्या हृदयात श्रद्धास्थानी आहेत. त्यांच्या छत्रछायेखाली शिवसेनेचे अनेक नेते घडले. मात्र राष्ट्रीय पुरुष, थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यासंबंधातील शासनाच्या ३० नोव्हेंबर २०१५ रोजीच्या परिपत्रकानुसार शिवसेनाप्रमुखांचे नाव नाही.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांनी पालिकेच्या महासभेत ठरावाची सूचना मांडून शिवसेनाप्रमुखांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्याची मागणी केली. या परिपत्रकामध्ये शिवसेनाप्रमुखांचे नाव समाविष्ट करून त्यांचीही जयंती साजरी करण्याचा या ठरावाच्या सूचनेला सर्वपक्षीयांनी जोरदार पाठिंबा दिल्यानंतर महापौरांनी हा ठराव मंजूर केला.

आपल्या अतुलनीय कार्यामुळे समाजमनावर ठसा उमटवणारे थोर नेते, राष्ट्रीय पुरुष यांची जयंती-पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्यात येते. यासाठी सरकारने ३० नोव्हेंबर २०१५ रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार शिवसेनाप्रमुखांचे नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, जेणेकरून त्यांच्या कार्याचा खर्‍या अर्थाने गौरव होईल, अशी भावना ठरावाच्या सुचनेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे हा प्रस्ताव आता आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला आहे. यानंतर राज्यसरकारकडे पाठवून त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -