घरक्रीडाहेसन, मूडी यांना मागे सोडत शास्त्रीच प्रशिक्षक

हेसन, मूडी यांना मागे सोडत शास्त्रीच प्रशिक्षक

Subscribe

रवी शास्त्री यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी फेरनिवड झाली आहे. भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या क्रिकेट सल्लागार समितीवर (सीएसी) सोपवण्यात आली होती. या तिघांनी ५ उमेदवारांच्या शुक्रवारी मुलाखती घेतल्यानंतर शास्त्री यांची २ वर्षांसाठी पुन्हा प्रशिक्षकपदी निवड करण्याचा निर्णय घेतला. २०२१ साली भारतात होणार्‍या टी-२० विश्वचषकापर्यंत ते प्रशिक्षकपदी राहणार आहेत. शास्त्री यांनी याआधी भारतीय संघाचे व्यवस्थापक (२००७), संचालक (२०१४-२०१६) आणि मुख्य प्रशिक्षक (२०१७-२०१९) म्हणून काम केले आहे.

जुलै २०१७ पासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणार्‍या शास्त्रींचा आणि सहाय्यक प्रशिक्षकांचा करार इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर संपुष्टात आला. परंतु आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी बीसीसीआयने त्यांना ४५ दिवसांची मुदतवाढ दिली होती. शास्त्री सध्या वेस्ट इंडिजला असल्यामुळे ते स्काईपवरून मुलाखतीसाठी हजर होते. ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी यांनीही शुक्रवारी स्काईपवरून मुलाखत दिली. भारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत, भारताचा माजी खेळाडू रॉबिन सिंग आणि न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन हे मुलखात देण्यास उपस्थित होते. फिल सिमन्स यांनी मात्र वैयक्तिक कारणांमुळे मुलाखत देण्यास नकार दिला. मुलाखती झाल्यानंतर शास्त्री यांनी हेसन आणि मूडी यांना मागे सोडले. त्यामुळे त्यांची पुन्हा प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.

- Advertisement -

कोहलीचे मत विचारात घेतले नाही -कपिल

प्रशिक्षकांची निवड करताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे मत विचारात घेतले नाही, असे क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष कपिल देव यांनी सांगितले. आम्ही कोहलीला याबाबत अजिबातच विचारणा केली नाही. आम्ही त्याचे मत विचारात घेतले असते, तर आम्हाला संपूर्ण संघाचेच मत विचारात घ्यावे लागले असते. आम्ही कोणालाही काहीही विचारले नाही, असे कपिल देव यांनी स्पष्ट केले. विंडीज दौर्‍याला रवाना होण्यापूर्वी शास्त्री यापुढेही प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास मला आवडेल, असे कोहली म्हणाला होता. तसेच क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी सांगितले की, शास्त्री सध्या भारताचे प्रशिक्षक असल्याने त्यांना खेळाडूंच्या जमेच्या आणि कमकुवत बाजू माहित आहे. ते या खेळाडूंना ओळखतात. याचा विचार करून आम्ही शास्त्रींची फेरनिवड केली.

शास्त्रींच्या मार्गदर्शनात उत्तम कामगिरी

रवी शास्त्री २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या मार्गदर्शनात भारताने २१ कसोटी सामन्यांपैकी १३, ६० एकदिवसीय सामन्यांपैकी ४३ आणि ३६ टी-२० सामन्यांपैकी २५ सामने जिंकले. त्यांच्याच मार्गदर्शनात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. तसेच २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी आणि २०१९ विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यात भारताला यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -