घरमुंबईथर्माकोलला पर्याय फोम, पुठ्ठा आणि प्लायवूड मखरांच्या किंमती वाढल्या!

थर्माकोलला पर्याय फोम, पुठ्ठा आणि प्लायवूड मखरांच्या किंमती वाढल्या!

Subscribe

थर्माकोलवर बंदी आणण्यात आल्यानंतर आता दादरच्या मार्केटमध्ये पुठ्ठे आणि प्लायवूडच्या डेकोरेशन आणि मखरांची रेलचेल दिसू लागली आहे.

मागील वर्षापासून लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल बंदीमुळे यंदा गणेशोत्सवात गणेश मूर्तींसाठी आकर्षक मखरांची उणीव भासू लागली आहे. परंतु, थर्माकोलला पर्याय म्हणून फोम, पुठ्ठा आणि प्लायवूडपासून बनवलेले सुबक मखर सध्या बाजारात आले आहेत. हे मखर थर्माकोलप्रमाणेच आकर्षक दिसत असून थर्माकोलच्या मखराच्या तुलनेत फोम, पुठ्यापासून बनवलेल्या या मखरांची किंमत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढलेली आहे. सध्या पाचशे ते सात हजारांपर्यंतचे मखर बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. गणरायांचे आगमन आठवड्यावर येऊन ठेपले आहे. बाप्पांची आगमनाची चाहूल लागल्याने मुंबईतील दादरसह अनेक भागांमधील बाजारपेठा आकर्षक मखरांनी सजल्या आहेत. मात्र, यंदा थर्माकोल बंदीमुळे फोम, जाड पुठ्ठा आणि प्लायवूडचा वापर करून सुबक मखर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Dadar Makhar Market

- Advertisement -

थर्माकोल नाही, तर फोमचे मखर!

राज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी केल्यामुळे मागील वर्षी कलाकारांना गणेशोत्सवात थर्माकोलच्या मखरांची विक्री करण्यास परवानगी दिली होती. परंतु, यंदा मखरांसाठी थर्माकोलचा वापर करताच येणार नसल्याने त्याला पर्याय म्हणून फोमचा वापर केला जात आहे. दादरच्या छबिलदास गल्लीसह बोरीवली, मालाड, कांदिवली, कुर्ला, भांडुप, घाटकोपर आदी भागांमध्ये अशा प्रकारचे आकर्षक मखर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या मखरांच्या खरेदीसाठी रस्ते फुलून गेले आहेत.

दादरच्या छबिलदास रोडवील श्री आर्ट्सचे जितेंद्र राक्षे यांनी सांगितले की, ‘हे मखर बनवण्याचे काम जानेवारी महिन्यापासून केले जात असते. थर्माकोलला बंदी आहे. परंतु सरकारने फोमला मान्यता दिली आहे. त्यामुळ त्यापासून मखर बनवले असून कार्डबोर्ड आणि पातळ प्लायवूडचा वापर केला आहे. थर्माकोलच्या तुलनेत या वस्तूंपासून मखर बनवण्यात अडचणी येतात. परंतु, त्यावर मात करत आमच्यासारखे कलाकार या वस्तूंपासून इकोफ्रेण्डली मखर बनवत असतात. उल्हास नगर, सातारा, कुर्ला आदी भागांमधील कारखान्यांमध्ये या मखरांच्या कामाला जानेवारीपासून सुरुवात होत असते’.

Dadar Makhar Market 1
दादर मार्केटमध्ये पुठ्ठ्याची सजावट

‘पुढच्या वर्षी किंमत कमी होईल’

सदगुरु आर्ट्सचे संजय जाधव यांनी सांगितले की, ‘थर्माकोलप्रमाणेच दिसणारे फोमपासून बनवलेले मखर असतात. थर्माकोलच्या चार ते पाच शिट एकत्र ठेवून कापले जायचे. परंतु फोमसह जाड पुठ्ठा आणि प्लायवूड यांची स्वतंत्रपणे कटिंग केली जाते. त्यामुळे हे मखर बनवायला जास्त वेळ लागत आहे. परिणामी कामगारांवरील खर्च वाढत आहे. त्यामुळेच थर्माकोलच्या तुलनेत या मखरांची किंमत ३० ते ३५ टक्क्यांनी अधिक आहे. सध्या बाजारात ५०० ते ७ हजारांपर्यंतचे मखर उपलब्ध आहेत. या वस्तूंपासून मखर बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने थोडा त्रास होत असला तरी भविष्यात अधिक सुलभपणे हे मखर बनवले जातील. त्यामुळे पुढील वर्षी यापासून बनवलेल्या मखरांची किंमत कमी होईल’, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

४ ते ५ वर्ष टिकणार मखर!

मखरांच्या सजावटीसाठी पुठ्ठयांचे कटिंग केलेले खांब तसेच आकर्षक साहित्य दुकानांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मखर बनवण्यासाठी पुठ्ठयांचे कटिंग केलेल्या साहित्य खरेदीसाठीही मुंबईकरांची गर्दी उसळलेली आहे. या साहित्यापासून बनवलेला मखर पुढील चार ते पाच वर्ष जतन करून पुन्हा वापरता येणार असला तरीही दरवर्षी बाप्पांची सजावट वेगळया प्रकारची करण्यासाठी धडपणार्‍या भाविकांना थर्माकोलचा वापर करता येत नसल्याची खंत मात्र नक्कीच वाटत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -