घरमहाराष्ट्रश्रीवर्धनचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना संतप्त ठेवीदारांकडून चोप !

श्रीवर्धनचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना संतप्त ठेवीदारांकडून चोप !

Subscribe

जनसेवा सहकारी पतसंस्थेतील प्रकार

श्रीवर्धनचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे व्यवस्थापक असलेल्या पतसंस्थेतील पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे संतप्त ठेवीदारांनी भुसाणे त्यांना गुरुवारी चोप दिला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी ठेवीदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचाही उपयोग झाला नाही. नरेंद्र भुसाणे हे खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शहरात प्रवेश करीत असतानाच हा प्रकार घडल्याने कार्यकर्तेही चांगलेच हबकले आहेत.

जनसेवा सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांना गेल्या दोन महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत. कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यानंतर पैसे दिले जातील, अशी नोटीस पतसंस्थेच्या कार्यालयावर लावण्यात आली होती. पतसंस्थेच्या संचालकांकडून 19 तारखेपर्यंत सर्व ठेवीदारांना पैसे परत केले जातील, असे सांगण्यात आले. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून ठेवीदारांनी पैसे परत मिळण्यासाठी कार्यालयाबाहेर गर्दी केली. मात्र पतसंस्थेकडून पैसे परत मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठेवीदार आक्रमक झाले. त्यांनी पतसंस्थेचे व्यवस्थापक नरेंद्र भुसाणे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत ठेवीदारांना कसे तरी रोखून धरले.

- Advertisement -

त्यानंतर सर्व ठेवीदारांनी आपला रोख पोलीस ठाण्याकडे वळवला आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलनास सुरूवात केली. पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हा दाखल करा आणि आमचे पैसे व इतर ठेवी परत करा, अशी मागणी ठेवीदारांनी केली. ठेवीदारांची आक्रमक भूमिका पाहून पोलिसांनी पोलीस ठाण्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. ठेवीदारांनी केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे शिवाजी चौक ते एसटी स्थानक मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

पतसंस्थेच्या गलथान कारभाराला खर्‍या अर्थाने कोण जबाबदार आहे, असा सवाल ठेवीदार विचारत आहेत. पतसंस्थेच्या व्यवस्थापकपदी काम करणारे नरेंद्र भुसाणे हे स्थानिक राष्ट्रवादीमधील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पतसंस्थेचा कारभार दोन वर्षांपासून बिघडत असल्याचे बोलले जाते. महावितरणने तीन महिन्यांपूर्वी जनसेवा पतसंस्थेत ग्राहकांना वीज बिले भरण्यास मनाई केली होती. तेव्हापासून पतसंस्थेच्या ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

दरम्यान, या पतसंस्थेतील प्रकरणाचे पडसाद थेट विधानसभा निवडणुकीतही उमटण्याची शक्यता आहे. कारण, मतदारसंघातील अनेकांच्या ठेवी या पतसंस्थेत आहेत. विशेष म्हणजे गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा श्रीवर्धनमध्ये आली. त्यापूर्वीच नगराध्यक्ष असलेल्या व्यक्तीला मारहाण झाल्याने वातावरण तापले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -