घरमुंबईअभिनेत्यांकडून मतदानाचे आवाहन

अभिनेत्यांकडून मतदानाचे आवाहन

Subscribe

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान गरजेचे-विजू माने

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. जगातील सर्व श्रेष्ठ अशी आपली भारतीय लोकशाही असून प्रजेला राजा निवडण्याचा अधिकार या मतदानातून मिळत आहे. भ्रष्ट व संधीसाधू राजकारण्यांना धडा शिकवण्याचे एकमेव आयुध जनतेच्या हाती असून ते म्हणजे मतदान. त्यासाठी जनतेने निष्पक्षपणे मतदान करून आपला हक्क बजावला पाहिजे, असे प्रतिपादन सिने नाट्य अभिनेते विजू माने यांनी केले. ते भिवंडीत वर्‍हाळा माता मंगल भवन येथे कॉलेज युवकांच्या मेळाव्यात बोलत होते. ठाणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी 137 – भिवंडी पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळदकर व 136चे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सदानंद जाधव व 134- भिवंडी ग्रामीणचे निवडणूक निर्णय अधिकारी राजू थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी पश्चिम,भिवंडी पूर्व व भिवंडी ग्रामीण या तीनही विधानसभा मतदारसंघातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता बुधवारी वराळादेवी माता मंगल भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सिने अभिनेता विजू माने म्हणाले, स्वच्छ चारित्र्याचे सरकार सत्तेवर आणावयाचे असल्यास युवकांनी मतदान प्रक्रियेत हिरीरीने सहभाग घेऊन जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी आग्रह केला पाहिजे. मतदानाचा टक्का वाढला तरच नागरीकांच्या हिताचे चांगले सरकार सत्तेवर येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर चित्रपट अभिनेते उदय सबनीस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि विद्यार्थ्यांनी मतदानासाठी आपल्या पालकांकडे आग्रह धरून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त केले पाहिजे. तरच आपण नागरिक शास्त्र शिकल्यासारखे होईल. अन्यथा आपल्या शिकण्याला काही अर्थ नाही असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघ स्वीप कक्ष प्रमुख संजय थोरात, नोडल अधिकारी मिलिंद पळसुले, नेहाला मोमीन, केंद्र प्रमुख शोएब मोमीन, ओमकार पवार, श्रध्दा घोलप आदींनी नियोजन केले होते.

- Advertisement -

मतदान करून लोकशाही बळकट करा- पुष्कर श्रोत्री

नवी मुंबई (वार्ताहर) । लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदार नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा याकरता मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग अर्थात स्वीप हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या अनुषंगाने मतदारांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहचविला जात आहे. या अनुषंगाने विद्यार्थी मतदारांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून नेरुळ सेक्टर 5 येथील एस.आय.ई.एस. महाविद्यालयात विद्यार्थी मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी सुप्रसिध्द सिनेनाट्य अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधत त्यांना लोकशाहीतील मतदानाचे महत्व पटवून दिले. मतदान हा आपला हक्क असून त्याद्वारे आपण भारतीय लोकशाही बळकट करतो, असे सांगत त्यांनी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे सांगितले. पहिल्यांदाच मतदान करणारे महाविद्यालयीन युवक-युवतींनी अत्यंत उत्साहाने मतदान करून आपला हक्क बजावलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी महाविद्यालयातील एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.

- Advertisement -

याप्रसंगी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्यासह स्वीप मोहिमेच्या प्रमुख रेवती गायकर, 151 बेलापूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, स्वीपचे नोडल अधिकारी महापालिका उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत तायडे आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळा क्र.101 शिरवणेचे विद्यार्थी उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागात स्वीप कार्यक्रमांचे प्रभावीरित्या आयोजन केले जात असून याद्वारे सर्व वयोगटातील सर्व स्तरातील नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -