घरमुंबईएपीएमसी मार्केटलाही पावसाचा तडाखा

एपीएमसी मार्केटलाही पावसाचा तडाखा

Subscribe

शहरात दोन दिवसांपासून सतत पडणार्‍या पावसाचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) भाजी मार्केटलाही बसला आहे. भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असली, तरी व्यापार्‍यांनी मार्केटकडे पाठ फिरवल्याने भाज्यांची खरेदी घटल्याचे दिसून आले.

शहरात दोन दिवसांपासून सतत पडणार्‍या पावसाचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) भाजी मार्केटलाही बसला आहे. भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असली, तरी व्यापार्‍यांनी मार्केटकडे पाठ फिरवल्याने शनिवारी भाज्यांची खरेदी घटल्याचे दिसून आले. कांद्याची आवक स्थिरावल्याने कांद्याचे दर घाऊक बाजारात १६ ते १७ रुपये किलोपर्यंत झाले. किरकोळ बाजारात हाच कांद्याचा दर २५ रुपये किलोच्या घरात गेला. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये रोजच्या तुलनेत शनिवारी भाज्यांची आवक जास्त झाल्याने दर काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र शुक्रवारी रात्रीपासूनच शहरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शनिवारी सकाळी अनेक व्यापार्‍यांनी मार्केटकडे पाठ फिरवली. दरदिवशी मार्केटमध्ये ५५० ते ५७० गाड्यांची आवक होत असते. शनिवारी मात्र,तब्बल ६२० गाड्यांची आवक बाजारात झाली. पालेभाज्याही मोठ्या प्रमाणात आल्याने त्या फेकून देण्याची वेळ व्यापार्‍यांवर आली. महिनाभरापूर्वी कांदा १० रुपये किलोच्या आत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी हे दर वाढायला सुरुवात झाली. रोज बाजारात ११५ गाड्या कांदा येत होता. मात्र, आता ८० ते १०० गाड्या कांदा बाजारात येत आहे.

कांदा व्यापार्‍यांचे खिसे गरम

आवक कमी झाली असल्याने बाजारात कांद्याचा पुरवठा काही प्रमाणात कमी होत आहे. त्यात आता थेट शहरात जाणार्‍या कांद्याच्या गाड्यांचे प्रमाण पावसामुळे कमी झाले आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याला चांगला दर मिळायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात १२ ते १४ रुपये किलो असणारा कांदा आता मात्र १६ ते १७ रुपये किलो झाला आहे. बाजारात कांद्याला उठाव असल्याने कांद्याचा दर वाढीव असणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, घाऊक बाजारात दर वाढले असल्याने किरकोळ बाजारात कांदा २५ रुपये किलो झाला आहे. येत्या काही दिवसात घाऊक बाजारात दरवाढ झाल्यास हे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणार आहे. पण व्यापार्‍यांचे खिसे गरम होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -