घरमुंबईभारतीय टपाल सेवेत दाखल होणार रोबो

भारतीय टपाल सेवेत दाखल होणार रोबो

Subscribe

पत्र, पार्सलची करणार वर्गवारी; आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांची कामगिरी

भारतीय टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमनवर कामाचा प्रचंड ताण असतो. पोस्टमनवरील हा ताण कमी करण्यासाठी आता टपाल खात्याने रोबोटची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी टपाल विभागाने आयआयटी मुंबईची मदत घेतली आहे. आयआयटीतील विद्यार्थ्यांनी बनवलेला रोबोट लवकरच भारतीय टपाल सेवेत दाखल होणार असून, या रोबोटमुळे टपाल व पार्सल वेगवेगळे करण्याचे काम रोबोटकडून करून घेण्यात येणार आहे.

डाकिया डाक लाया, हे गाणे आजही पोस्टमनला पाहिल्यावर सर्वसामान्यांच्या तोडातून सहज बाहेर पडते. परंतु बदलत्या काळानुसार टपाल विभागासमोर मेल, मोबाईलवरून पाठवण्यात येणारे संदेश व सोशल मीडियामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी टपाल विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. परंतु हे उपक्रम राबवताना टपाल विभागाची सर्व धुरा ही पोस्टमन यांच्यावरच असते. टपाल विभागाने गतवर्षी ग्राहकांना बँक खाते घरच्या घरी सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. टपाल विभागाने वर्षभरात तब्बल 1 लाखापेक्षा अधिक खाती उघडण्यात आली.

- Advertisement -

हा उपक्रम पोस्टमनमुळेच यशस्वी झाला. पोस्टमनवर असलेल्या विविध जबाबदार्‍या लक्षात घेऊन त्यांच्यावरील ताण कमी करण्याचा निर्णय टपाल विभागाने घेतला. त्यानुसार टपाल विभागाच्या विविध ठिकाणी असलेल्या हबमध्ये रोबोटचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी टपाल विभागाने आयआयटी मुंबईशी संपर्क साधला होता. टपाल विभागाने दिलेल्या सूचनांनुसार आयआयटी मुंबईच्या डिझाईन इनोव्हेशन सेंटर आणि ई-यात्रा लॅबने एकत्र येऊन रोबोट बनवला आहे. रोबोटला दिलेल्या सूचनेनुसार हा रोबोट कोडनुसार एका ठिकाणाहून पार्सल व डिलिव्हरी उचलून अन्य ठिकाणी ठेवण्याचे काम करेल. ई-यात्रा लॅबचे प्राध्यापक कवी आर्या व डिझाईन इनोव्हेशन सेंटरचे प्राध्यापक बी.के. चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला आहे. या रोबोटचे प्रात्यक्षिक राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासमोर दाखवण्यात आले.

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला रोबोट हा टपाल विभागाच्या विविध हबमध्ये येणारे मोठमोठे पार्सल त्यांच्यावर असलेल्या शहराच्या व विभागाच्या कोडनुसार वेगळे करणार आहे. त्यामुळे हबमध्ये काम करणार्‍या पोस्टमनवरील बराच मोठा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. रोबोटचे मुख्य काम हे हबमध्येच असणार आहे. त्यामुळे छोट्या टपाल कार्यालयातील काम मात्र पोस्टमन यांनाच करावे लागणार आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला रोबोट सध्या कलर कोडनुसार काम करत आहे. परंतु त्याच्यावर अधिक काम सुरू असून, लवकरच त्याला शहर व विभागाचे कोड देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विभागाचे पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांनी दिली.

- Advertisement -

रोबोटमुळे पोस्टमनवरील कामाचा ताण कमी होऊन त्यांना ग्राहकांशी आपुलकीचे संबंध ठेवण्यास वेळ मिळणार आहे. परिणामी पोस्टाचे काम अधिक सुलभतेने व जलदगतीने होईल. रोबोटवर सध्या काम सुरू असून, आयआयटीचे विद्यार्थी यावर अधिक काम करत आहेत. लवकरच रोबोट भारतीय टपाल खात्यात दाखल होईल.
– स्वाती पांडे, पोस्टमास्तर जनरल, मुंबई विभाग

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -