घरमहाराष्ट्रफोटोत दिसणारे तीनही आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या छावणीत

फोटोत दिसणारे तीनही आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या छावणीत

Subscribe

अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणारे ९ पैकी ८ आमदार राष्ट्रवादीत परतले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी झालेल्या अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काल राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ९ आमदार उपस्थित होते. यापैकी आठ आमदारांनी परतीचा मार्ग पत्करला आहे. काल पाच आमदारांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान गाठून आम्ही शरद पवारांसोबतच असल्याचे दाखवून दिले होते. मात्र कळवणचे आमदार नरहरी झिरवळ अद्यापही आऊट ऑफ रेंज आहेत. कालच्या शपथविधीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, या फोटोमध्ये दिसणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार राष्ट्रवादीच्या छावणीत परतले आहेत.

राजभवनात शपथविधीचा फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि निफाडचे दिलीप बनकर दिसत आहेत. अजित पवार यांनी आपली दिशाभूल करत राजभवनात शपथविधीला नेले असल्याचे तीनही आमदारांनी स्पष्ट केले आहे. यापैकी माणिकराव कोकाटे हे सध्या हॉटेल रेनेसाँमध्ये इतर आमदारांसोबत मुक्कामास आहेत. तर आबासाहेब पाटील आणि दिलीप बनकर कौटुंबिक कारणामुळे आपल्या मतदारसंघातच थांबले असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

दरम्यान तीनही आमदारांनी ट्विटर आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपापली भूमिका मांडली आहे. निफाडचे दिलीप बनकर म्हणाले की, मी शरद पवार साहेबांसोबतच आहे. अजित पवार गटनेते आहेत. त्यामुळे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून राजभवनात गेलो होतो.

- Advertisement -

माणिकराव कोकाटे हे भाजपचे माजी आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट दिले नाही, म्हणून त्यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर ते आमदार म्हणून निवडून आले. अजित पवार यांच्यासोबत राजभवनात दिसल्यामुळे त्यांच्यावर संशयाची सुई सरकली होती. मात्र त्यांनी ट्विट करुन आपली बाजू मांडलेली आहे.

यापैकी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांचा काल संध्याकाळपर्यंत पत्ता लागलेला नव्हता. मात्र त्यांनी देखील पक्षाला पाठविलेल्या व्हिडिओमध्ये मी शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असे सांगितले आहे. त्याचबरोबर अजित पवार हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच असल्याचेही ते म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -