घरविधानसभा २०१९अजित पवारांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीला अपयशच

अजित पवारांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीला अपयशच

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी पुन्हा पक्षात यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आज दुपारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली. तिनही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. मात्र, पवार आपल्या मतावर ठाम आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांची पवारांची मनधरणी करण्याची ही फेरी देखील अयशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा – हॉटेल रेनेसाँमध्येच होते कर्नाटकचे बंडखोर आमदार; भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होईल?

- Advertisement -

‘या’ नेत्यांनी पवारांची मनधरणी करण्याचा केला प्रयत्न

जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवार यांना पक्षात स्वगृही परतण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी काल अजित पवारांची भेट घेतली. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी एका व्हिडिओमार्फत राष्ट्रवादी पक्षात पुन्हा येण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय सुप्रीया सुळे यांनी अजित पवारांना भावनिक आवाहन केले आहे. तर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित तरुण आमदार रोहित पवार यांनी देखील आपले काका अजित पवार यांना पक्षात परत येण्याची विनंती केली आहे.


हेही वाचा – फोटोत दिसणारे तीनही आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या छावणीत

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस पक्षांसोबत युती करुन सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असताना राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन करणे ही बाबच मुळात राज्यातील जनतेच्या सहजासहजी पचनी पडणारी नव्हती. मात्र, राजकारणात काही गोष्टी अनपेक्षित घडतात, हे आता जनतेने गृहित धरले आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे अनेकांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला. मात्र, पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी कुणालाही न सांगता भाजपशी हातमिळवणी केली असल्याचे सांगितले. तेव्हापासून राष्ट्रवादीकडून वारंवार अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, अजित पवार आपल्या मतावर ठाम आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -