घरमहाराष्ट्रनाशिकराज ठाकरेंच्या नावाने भुजबळांचा थेट फडणवीसांना टोला!

राज ठाकरेंच्या नावाने भुजबळांचा थेट फडणवीसांना टोला!

Subscribe

विधानसभेत शनिवारी ठाकरे सरकारचं बहुमत सिद्ध झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी छगन भुजबळ यांनी शुभेच्छा देताना भाजपवर खोचक शब्दांमध्ये सुनावलं.

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर विधानसभा सभागृहात एकापेक्षा एक भाषणे झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना माजी मुख्यमंत्र्यांना शाल जोड्यातून मारल्यानंतर इतर सदस्यांनीही त्यांची री ओढली. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपल्या खास शैलीत विरोधी पक्षनेत्यांना ‘शुभेच्छा’ दिल्या. यावेळी, ‘उद्धव ठाकरेंनी सगळ्यांच्या अपेक्षा जशा पूर्ण केल्या, तशा त्यांच्या भावाच्या म्हणजेच राज ठाकरेंच्या देखील अपेक्षा पूर्ण केल्या’, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंच्या इच्छेला दिला न्याय!

‘मनसेप्रमुख राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवत असताना त्यांना सतत विचारलं जायचं की तुम्ही निवडणूक का लढवत आहात? तेव्हा ते म्हणायचे राज्याला मजबूत विरोधी पक्ष देण्यासाठी निवडणूक लढतोय. राज ठाकरेंनी जी इच्छा व्यक्त केली होती, त्या इच्छेला न्याय देण्याचे काम त्यांच्या मोठ्या बंधूंनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने राज्याला मजबूत विरोधी पक्ष दिलेला आहे’, असं छगन भुजबळांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

- Advertisement -

‘भाजपने रात्रीचे खेळ बंद करावेत’

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे खूप हुशार आहेत. मात्र मला त्यांची भीती वाटते. कारण ते एका रात्रीत काय करतील, त्याचा काहीही भरोसा नाही. विरोधी पक्षनेते म्हणून चांगले काम करण्याच्या फडणवीस यांना मी शुभेच्छा देतो. मात्र, आता तरी त्यांनी रात्रीचे खेळ बंद करावेत’, असे सांगत भुजबळ यांनी भाजपच्या रात्रीतून शपथविधी करण्याच्या कृतीवर निशाणा साधला.


‘मी येईन म्हणालो नव्हतो, पण आलो’; उद्धव ठाकरेंचे पहिलेच तुफान भाषण

‘फडणवीसांनी खडसेंसारखं काम करावं’

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांना एकनाथ खडसेंच नाव घेऊन भुजबळांनी डिवचल्याचं पहायला मिळालं. ‘आम्ही सभागृहात पाहिले आहे. जेव्हा एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते, तेव्हा ते हळूच एखादा कागद फडणवीस यांना देऊन त्यांना बोलायची संधी द्यायचे. ज्याप्रमाणे खडसेंनी तुम्हाला तयार केले, त्याप्रमाणे आता फडणवीसांनी मागच्यांना तयार करावे. मागच्या बाकावर बसणाऱ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करावा’, असा खोचक टोला भुजबळांनी यावेळी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -