घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांसमोरच अजित पवार-अशोक चव्हाण यांच्यात जुंपली!

मुख्यमंत्र्यांसमोरच अजित पवार-अशोक चव्हाण यांच्यात जुंपली!

Subscribe

महाविकासआघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जरी झाला असला, तरी अद्याप खातेवाटपाला मुहूर्त लागलेला नाही. त्यासाठीच्याच बैठकीमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांसमोरच काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.

महाविकास आघाडीचे सरकार बनून महिना उलटला असला तरी अजून तरी महाविकास आघाडीतील नेत्यांमधील धुसफूस काही कमी होताना दिसत नाहीये. एकीकडे मंत्रिपद न मिळल्याने नाराजी नाट्य वाढत असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांच्यामधील धुसफूस समोर आली आहे. गुरुवारी आघाडीच्या बैठकीदरम्यान खातेवाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत असून, हे वाद चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर झाल्याचे बोलले जात आहे.

नेमके काय आहे वादाचे कारण?

खातेवाटपावर चर्चा करण्यासाठी काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत अशोक चव्हाण यांच्याकडून कृषी, ग्रामविकास किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी झाली. मात्र, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख केला. याचवेळी अशोक चव्हाण यांचा पारा चढला आणि त्यांनी ‘आम्हीही मंत्रिमंडळात आहोत. ते मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. मग त्यांचा येथे काय संबंध? मीही माजी मुख्यमंत्री असून, काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे बालयचं आहे ते बैठकीत समोर असणाऱ्यांशी बोला’, असे अशोक चव्हाण यांनी अजित पवारांना सुनावल्याचे समजते.

- Advertisement -

…आणि अशोक चव्हाण रागात निघून गेले!

दरम्यान, अशोक चव्हाण संतापल्यानंतर अजित पवार यांनी ‘पृथ्वीराज चव्हाण संयमी नेते असल्याचे म्हटले. एवढेच नाही तर पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत. सत्तास्थापनेपासूनच्या चर्चेत तेही होते. तुमच्यात नेता कोण आहे हे तुम्ही एकदा बाहेर जाऊन ठरवा’, असे अजित दादांनी म्हणताच अशोक चव्हाण यांचा पारा चढला आणि ते बैठकीतून बाहेर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -