घरमहाराष्ट्रसाईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद चिघळला; आजपासून शिर्डी बंद

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद चिघळला; आजपासून शिर्डी बंद

Subscribe

कायदेशीर लढा देण्याचा खासदार डॉ. विखेंचा इशारा

साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी पाथरी असा केल्याने शिर्डीत यावरुन वाद चिघळला आहे. शिर्डीसह परिसरातील २५ गावातील ग्रामस्थांनी आक्रमक होत रविवारी शिर्डी बंदची हाक दिली आहे. माजी मंत्री व शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे यांनीदेखील शनिवारी आपली भूमिका स्पष्ट केली. तर कायदेशीर लढा देण्याचा इशारा भाजपचे नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीला साईबाबांचे जन्मस्थान असल्याचा उल्लेख केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी हे शिर्डीपासून २७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुख्यमंत्र्यांनी पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटींचा निधी देण्यास हरकत नाही, मात्र साईबाबांचे जन्मस्थान असल्याचे सांगून पाथरी निधी देण्याची घोषणा केली.

- Advertisement -

याला शिर्डीकरांचा आक्षेप असल्याने शिर्डीकर संतप्त झाले आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाविषयी कोणतीही माहिती नसली तरी ते शिर्डी येथे येऊन तेथेच स्थायिक झाले. त्यामुळे देश आणि परदेशात शिर्डीची ओळख साईबाबांची शिर्डी अशी झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वक्तव्याने शिर्डीकर नाराज झाले असून त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. रविवारपासून शिर्डी बंदचा निर्णय घेण्यात आला असून आता हा विरोध तीव्र बनू लागला आहे. राज्य सरकारने साईबाबांच्या सर्वधर्म समभाव या विचारधारेलाच काळीमा फासले जाणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जोपर्यंत पाथरीचा साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख मागे घेतला जाणार नाही, तोपर्यंत शिर्डीकरांचे आंदोलन थांबणार नाही. साईभक्तदेखील या आंदोलनात सक्रीय होण्याची चिन्हे आहेत.

आमदार राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले होते. त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात चुकीची माहिती दिली गेल्याचे स्पष्ट केले. साईबाबांच्या जन्मस्थळाबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेले वक्तव्य मागे घेण्याची मागणी त्यांनी शनिवारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत केली. ब्रिटीशांनादेखील न मिळालेले पुरावे पाथरीकरांनी कसे शोधले असा प्रश्न करत साईबाबांनी त्यांची वैयक्तीक माहिती त्यांच्या हयातीत कधीही सांगितली नसल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

बंदच्या काळातदेखील साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन, सर्व आरत्या आणि धार्मिक विधी, संस्थानचे साईप्रसादालय, सर्व भक्त निवासस्थाने, रुग्णालये या सुविधा नेहमीप्रमाणेच सुरु राहणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -