घरफिचर्सरंगऋषी बाबा कारंथ !

रंगऋषी बाबा कारंथ !

Subscribe

माझ्यासाठी व्यक्तिगत अविस्मरणीय क्षण म्हणजे कारंथजींनी निर्माण केलेल्या आणि फुलवलेल्या दोन्ही रेपर्टरी म्हणजे ‘भारत भवन रंगमंडल, भोपाळ’ आणि ‘रंगायन’ या वास्तूंना भेट देता आली. नुसतीच भेट नाही तर तिथे परफॉर्म करण्याची संधीसुद्धा लाभली. कारंथजी या माणसाबद्दल मी काय बोलणार? त्यांनी उभं केलेलं कामच बोलतं त्यांच्याबद्दल. मला हा माणूस ‘रंगऋषि’ वाटतो. कदाचित म्हणूनच सगळ्यांसाठी ते ‘बाबा’ कारंथ होते.

अठरा जानेवारीची संध्याकाळ दीर्घकाळ स्मरणात राहील, अशीच होती. त्या संध्याकाळी मी मैसूरच्या ‘रंगायन’ या ब.व.कारंथ यांनी कर्नाटक सरकारच्या सहकार्याने स्थापन केलेल्या रेपर्टरीमध्ये आमच्या ‘ध्वनिरंग’ या हिंदी थिएट्रिकल गाण्यांच्या कोलाजचा प्रयोग सादर केला. प्रयोग नेहमीसारखाच उस्फूर्त आणि श्रोत्यांच्या प्रतिसादाने उत्तरोत्तर फुलत गेला. प्रयोग झाल्यावर दोन गृहस्थ आम्हाला भेटण्याकरता म्हणून बॅकस्टेजला आले. दोघेही मोडकीतोडकी हिंदी बोलत होते. स्वाभाविकच होतं ते. गेली तीस ते पस्तीस वर्षे मैसूरमध्ये कामनिमित्त स्थायिक झालेले ते दोघेजण कानडी हेलात हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी माझं नाव सांगताच दोघांचेही डोळे लकाकले आणि आपला परिचय देत अस्खलित मराठीत ते म्हणाले, मी माधव खरे आणि हे जयराम पाटील.

दोघांची नावं ऐकल्याबरोबर मात्र मी उडालोच आणि मग आपलीच माणसं भेटल्यागत सरळ मराठीवर उतरलो. पुढचा दीड तास जी मैफल रंगली गप्पांची, त्याला तोड नव्हती. माधव खरे हा माणूस गेली तीस वर्षे तिथे स्थायिक आहे नोकरीच्यानिमित्ताने. पण मराठी साहित्य आणि विशेषतः नाटकाविषयी आजही आस्था बाळगून असलेला. खरं आश्चर्य तर जयराम पाटील या गृहस्थाचं. हा तसा मूळ मुंबईकरच. सत्तरीच्या दशकात मुलुंड, ठाणे ते पार डोंबिवलीपर्यंत वस्ती करून राहिलेला. आमचा प्रयोग झाल्यावर त्यांनी पहिली आठवण सांगितली ती दादरच्या छबिलदासची. तिथे तीन रुपयांचं तिकीट काढून अमोल पालेकर, नाना, नसीर आणि दुबेजींच्या नाटकांची असंख्य पारायणं केल्याची आठवण सांगताना हा माणूस भलताच नॉस्टॅल्जिक झाला होता.

- Advertisement -

आमच्या प्रयोगातल्या ‘महानिर्वाण’मधल्या माझ्या स्वगतानंतर ते ट्रान्समध्ये गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि डोळ्यासमोर आला कारंथसाहेबांनी केलेला भाऊरावचा रोल. तेव्हा उगाचच अंगावर मूठभर मांस चढू लागल्याचं मला जाणवलं. त्यानंतर सलग दीड तास हा माणूस केवळ आणि केवळ ‘कारंथजी’ या एकाच विषयावर बोलत राहिला आणि मी मुग्ध होऊन ऐकत राहिलो. कारंथ साहेबांनी पाहिलेलं स्वप्न. ते प्रत्यक्षात आणताना सगळ्याच पातळीवर घेतलेले अपार कष्ट. अभिनेत्यांसोबत काम करण्याच्या त्यांच्या पद्धती आणि बरंच काही……!

जुने वैभवाचे दिवस आठवत असताना सध्याच्या रेपर्टरीच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल बोलताना या माणसाच्या मनातली खंत जाणवत होती. पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचवेळेस समकालीन मराठी रंगभूमीविषयी असलेली आस्थाही डोकावत होती. विशेषतः अतुल पेठे यांच्या ‘सत्यशोधक’ या नाटकाबद्दल खूप भरभरून बोलत होते जयराम पाटील. गप्पांच्या ओघात नाटकाव्यतिरिक्त या माणसाचे इतरही अनेक पैलू असल्याचे जाणवत गेले. जयराम पाटील आणि त्यांच्या पत्नी रजनी पाटील, दोघेही पराकोटीचे प्राणीप्रेमी आहेत. त्यांच्या घरी असलेल्या सहा वेगवेगळ्या जातींचे कुत्रे आणि घराच्या आवारात मनमुराद फिरणार्‍या खारी पाहून आणि त्यांच्या पोटापाण्याची यांनी केलेल्या व्यवस्था पाहून रजनी पाटलांना मी म्हणालो की, तुमचं घर म्हणजे प्राणीसंग्रहालय आहे. त्या मुळातच कानडी असल्याने मराठी आणि हिंदी समजण्याचा प्रश्न नव्हता.

- Advertisement -

मग प्राणीसंग्रहालय या शब्दाचं इंग्रजीत ‘झू’ असं भाषांतर करून सांगितल्यावर त्या ज्या गडगडाटी हसल्या की विचारता सोय नाही. दर वर्षाच्या फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास हे जोडपं ‘बाय रोड’ भारतवारी करतं आणि वर्षातून तीनदा हेमलकसाला आवर्जून भेट देतं. प्रकाश आमटेंबद्दल अपरंपार आदर आहे या दोघांच्या मनात. त्यांचा असा ठाम विश्वास आहे की आमटेसारखी माणसं आज अवतीभवती असल्याकारणानेच माणुसकीचा तोल साधला गेलाय. आपण म्हणतो तितका समाज काही अजून रसातळाला गेलाय, असं त्यांना वाटत नाही. या सगळ्या गप्पा चालू असताना पान चघळण्याची त्यांची सवय पाहून मला दामुकाका केंकरेंची आठवण येत होती.

माझ्यासाठी व्यक्तिगत अविस्मरणीय क्षण म्हणजे कारंथजींनी निर्माण केलेल्या आणि फुलवलेल्या दोन्ही रेपर्टरी म्हणजे ‘भारत भवन रंगमंडल, भोपाळ’ आणि ‘रंगायन’ या वास्तूंना भेट देता आली. नुसतीच भेट नाही तर तिथे परफॉर्म करण्याची संधीसुद्धा लाभली. कारंथजी या माणसाबद्दल मी काय बोलणार? त्यांनी उभं केलेलं कामच बोलतं त्यांच्याबद्दल. मला हा माणूस ‘रंगऋषी’ वाटतो. कदाचित म्हणूनच सगळ्यांसाठी ते ‘बाबा’ कारंथ होते. आपल्या जन्मभूमीपासून दूर जाऊन दुसर्‍या अपरिचित ठिकाणी नाट्यविश्व उभारणं आणि ते उभारून झाल्यावर तिथला कसलाही मोह न बाळगता ते तिथेच सोडून नव्या वाटा शोधायला निघून जाणे, हा बाबुकोडी व्यंकटरमण कारंथ या माणसाचा अखंड जीवनक्रम होता !

नुकताच देशभरात दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे आयोजित केला जाणारा ‘भारत रंग महोत्सव’ पार पडला.

भारंगमची माझी हृद्य आठवण म्हणजे 2003 साली महोत्सवाचे उद्घाटन, कारंथजींनी संगीतबद्ध केलेल्या वेगवेगळ्या नाटकांमधल्या निवडक गाण्यांच्या संगीतमय कोलाजच्या, आम्ही (संवेदना परिवार) ने सादर केलेल्या प्रस्तुतीने झाले होते. साधारण एक-दीड वर्ष आधी कारंथजींचं निधन झालं होतं आणि माझ्या आठवणीप्रमाणे, 2003 चा महोत्सव एनएसडीने कारंथजींच्या स्मृतीस अर्पण केला होता.

भोपाळच्या ‘रंगमंडल’ मध्ये असताना, आळेकरांचं ‘महानिर्वाण’ कारंथजींनी दिग्दर्शित केलं होतं. त्यात ‘भाऊराव’ची मुख्य भूमिका ते स्वतः करत असत. त्या नाटकातल्या, ‘आवा चालली पंढरपुरा’च्या हिंदी अवताराचं, ‘सास चली जब पंढरपूर को’चं रिव्हायवल माझ्या वाट्याला आलं होतं. माझ्यासाठी तो अनुभव ‘डिव्हाईन’ होता…..मजा म्हणजे, महानिर्वाण करताना कारंथजी जो स्वतः वापरत असत, तोच कॉस्च्युम आम्ही रंगमंडलहून खास मागवला होता. आणि तोच परिधान करून मी त्या प्रस्तुतीत सहभागी झालो होतो.

रंगमंचावर उभं राहून आपल्या वाट्याला आलेले संवाद पाठ करत केलेली भूमिका म्हणजेच केवळ मी नाटक केले किंवा मी थिएटर करतो असं सांगण्यासाठी पुरेसं नसतं. नाटकाच्या निमित्ताने जे वातावरण मी अनुभवतो, ज्या सहकलाकारांसोबत माझा जास्तीत जास्त वेळ व्यतीत करतो, आदान-प्रदानाची जी महत्वाची सत्रे या एकत्र घालवलेल्या वेळेत पार पडत असतात त्याचा पाठपुरावा करतो, कलाकारांइतक्या किंबहुना त्यांच्यापेक्षाही अधिक सजग आणि जाणकार प्रेक्षकांनी आपल्या कामांबद्दल दिलेल्या प्रतिक्रियांवर साधक बाधक विचार करत, त्यानुसार आपल्या कामात सुधारणा करत, आपल्या जगण्याचा जो एक अनुभवाने समृद्ध असा कारवाँ पुढे नेत असतो, त्याला मी थिएटर करणे म्हणतो. शेवटी नाटक म्हणजे दुसरं काय असतं ? आपल्याच जगण्याचं रंगमंचावरील सुसंस्कृत प्रतिबिंब असतं.

-समीर दळवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -