घरCORONA UPDATEमुंबई महापालिकेच्या खिचडी, पुलावचा लोकांना आलाय विट!

मुंबई महापालिकेच्या खिचडी, पुलावचा लोकांना आलाय विट!

Subscribe

एकाच प्रकारची खिचडी व पुलावचे वाटप होत असल्याने नागरीकांना हे जेवण खाऊन विट आलाय. वारंवार हेच जेवण पुरवले जात असल्याने आता नागरिकही आता ही पाकिटे परत करत आहेत.

मुंबईतील गरीब, गरजू व  निराधार व्यक्तींना तसेच कुटुंबांना महापालिकेच्यावतीने अन्नाची पाकिटे पुरवली जाते. प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात ५०० ते ७०० अन्नाची पाकिटे वाटली जात आहेत. एकाच प्रकारची खिचडी व पुलावचे वाटप होत असल्याने नागरीकांना हे जेवण खाऊन विट आलाय. वारंवार हेच जेवण पुरवले जात असल्याने आता नागरिकही आता ही पाकिटे परत करत आहेत. त्यातच काही भागांमध्ये दुपारी अडीच नंतर ही अन्न पाकिटे पोहोचली जात असल्याने बऱ्याचदा ती खराब होतात. त्यामुळे भांडुपमधील नगरसेविकेने आयुक्तांना पत्र पाठवून, अशाप्रकारची जेवणाची पाकिटे वाटून जनतेच्या रोषाचे धनी व्हायचे नाही. त्यामुळे महापालिकेनेच आता ही पाकिटे आपल्या विभागात वाटावी, असे कळवले. परंतु त्यानंतरही खराब झालेली पाकिटे या विभागात वाटली गेली.

कोरोना पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या ‘लॉक-डाऊन’ मुळे अनेक स्थलांतरित कामगार घरी जाऊ शकले नाहीत. तर बाजारपेठ, उपहारगृह इत्यादी बंद असल्यामुळे त्यांच्या रोजच्या जेवणाचीही सोय होणे कठीण आहे. त्यामुळेच मुंबईत अडकलेल्या या कामगारांसह गरीब, गरजुंच्या रोजच्या जेवणाची मुंबई महानगरपालिके माध्यमातून करण्यात येत आहे. या अंतर्गत १ लाख ५७ हजारांपेक्षा अधिक स्थलांतरित कामगार आणि बेघर व्यक्तींसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. दिवसाच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी दररोज तब्बल ९ लाखांपेक्षा अधिक चपात्या, ३१ हजार किलो भाजी किंवा या ऐवजी ९५ हजार किलो पुलाव वा खिचडी यांचे वितरण केले जात आहे. असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु काही विभागांमध्ये सातत्याने पुलाव किंवा खिचडी याशिवाय काहीच दिले जात नाही. महापालिका चपाती आणि भाजी देत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात लोकांच्या दृष्टीसही वस्तू पडत नाही. केवळ प्रत्येक विभागांमध्ये खिचडी आणि पुलाव असेच जेवण पुरवले जात आहे. त्यामुळे यावर लाखो रुपयांचा खर्च करूनही लोकांचे समाधान करता येत नाही.

- Advertisement -

मुंबईतील अनेक भागांमध्ये या अन्नांच्या पाकिटांचे वाटप केले जाते.परंतु सातत्याने खिचडी आाणि पुलावच उपलब्ध होत असल्याने नागरिकही कंत्राटळे आहेत. चेंबूर परिसरात पुलावचे वाटप होते. परंतु आता तरी लोक पुलावचे नाव ऐकून पाकिटेही घेत नाही, अशी तक्रार एम-पश्चिम विभागाच्या अध्यक्षा आशा मराठे यांनी केली आहे. या अन्न पाकिटांऐवजी शिधाची पाकिटांची मागणी करूनही ती उपलब्ध होत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

भांडुप परिसरात सातत्याने खिचडीची पाकिटे वापरली जात आहे. मात्र, दुपारी अडीच पर्यंत ही पाकिटे येतात आणि लोकांपर्यंत वाटेपर्यंत ४ वाजतात. पण तोपर्यंत ती खराब होता. अशाप्रकारची खराब झालेली पाकिटातील अन्नामुळे विषबाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल करत स्थानिक नगरसेविका जागृती पाटील यांनी आयुक्तांना पत्र पाठवून अशाप्रकारची पाकिटे मी वाटणार नाही तर महापालिकेनेच वाटावी,असे कळवले. त्यानंतर शुक्रवारीही दुपारी १ वाजता पाकिटे उपलब्ध झाली आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ती वाटली. परंतु ही सर्व पाकिटे खराब झालेली आढळल्याने ती पाकिटे गोळा करून जागृती पाटील यांनी एस विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे असेच प्रकार जर होणार असतील, अशी पाकिटे वाटून माझ्या विभागातील जनतेचे आरोग्य धोक्यात का घालायचे असा सवाल त्यांनी केला. ही एकप्रकारची थट्टाच केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -