घरमुंबईअंतिम सत्राच्या परीक्षाही रद्द करा

अंतिम सत्राच्या परीक्षाही रद्द करा

Subscribe

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आयोगाला पत्र

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विद्यापीठांना पदवीच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा घेणे अवघड आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि विद्यार्थी संख्या पाहता सामाजिक अंतर विषयक निकषांचे पालन करून ८ ते १० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येऊ नये, तसेच ग्रेड प्रदान करण्याच्या सूचनेला मान्यता देण्याची मागणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात आता राज्यस्तरावरही दोन दिवसात बैठक होणार आहे.

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमधील परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाच्या नियोजनाबाबत महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय समिती गठित केली होती. त्यानुसार विविध गटांशी चर्चा केल्यानंतर राज्यस्तरीय समितीने ६ मे रोजी शासनाकडे अहवाल दिला. या अहवालानुसार अकृषी विद्यापीठांमधील, पदवीपूर्व आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये प्रवेश देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना ग्रेड देण्याची कार्यवाहीही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तसेच राज्यस्तरीय समितीच्या सूचनांना अनुसरून केली जाणार आहे. पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा होणार आहे.

- Advertisement -

या परीक्षा कोविड-१९मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने सामाजिक अंतर राखणे, तसेच विद्यार्थ्याचे आरोग्य आणि सुरक्षा यांचे गांभीर्य लक्षात घेता अडचणीचे ठरणार आहे. ८ ते १० लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा जुलैमध्ये घेणे कठीण वाटते. कारण कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा वेग पाहता सामाजिक अंतराबाबत निकषांचे पालन शक्य वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकणे संयुक्तिक ठरणार नाही, असेही सामंत यांनी पत्रात म्हटले आहे.

लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यामधील अव्यवहार्यता, तसेच विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यांचा विचार करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा न घेता त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रेड प्रदान करणे या पर्यायाला मान्यता देण्यात यावी व तशा मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात अशी विनंती आयोगाचे अध्यक्षांकडे एका पत्राद्वारे सामंत यांनी केली आहे. यासंदर्भातील माहिती सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना देत यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि राज्य सरकार युजीसीच्या रिप्लायवर अंतिम निर्णय घेत विद्यार्थ्याना अंतिम माहिती देण्यात येईलही, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -