घरCORONA UPDATEसमन्वय गोंधळाचा अजून एक नमुना! महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रवाशांना मनस्ताप!

समन्वय गोंधळाचा अजून एक नमुना! महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रवाशांना मनस्ताप!

Subscribe

मजुरांसाठी चालवल्या जाणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या तिकिटांचे पैसे कुणी द्यायचे? यावर मनसोक्त घोळ घालून झाल्यानंतर आता रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यातल्या समन्वय गोंधळाचा अजून एक अस्खलित नमुना समोर आला आहे. या गोंधळामुळे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. रेल्वेने चूक लक्षात आल्यानंतर ती सुधारेपर्यंत शेकडो लोकांची तिकीट बुकिंग झाली होती. पण ही चूक दुरूस्त करायला इतका वेळ का लागला? लोकांच्या मनस्तापाला कारणीभूत नक्की कोण? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्याची सुरुवात झाली ती रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगपासून!

आंतरजिल्हा बंदी, पण तिकिटं उपलब्ध!

२१ मे अर्थात आजपासून रेल्वेने सामान्य प्रवाशांसाठीच्या ट्रेनची ऑनलाईन बुकिंग सुरु केली. येत्या १ जूनपासून देशभरात १०० रेल्वे रिटर्न फेऱ्या करणार असून असे २०० प्रवास रोज रेल्वेच्या माध्यमातून मजुरांव्यतिरिक्त सामान्य प्रवाशांसाठी ही सोय असणार आहे. या सर्व ट्रेन नॉन एसी असणार आहेत. याची घोषणा झाल्यानंतर आज सकाळी १० वाजेपासून त्याची रीतसर ऑनलाईन बुकिंग देखील सुरू झाली. मात्र, तिथेच घोळ झाला. देशभरात ट्रेन सुरू झाल्या असल्या, तरी प्रत्येक राज्याचे लॉकडाऊनचे नियम मात्र वेगळे आहेत. महाराष्ट्रात आंतरजिल्हा म्हणजेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी नाही. मात्र, ही बाब रेल्वेला बहुधा माहितीच नसल्यामुळे रेल्वेने सर्व प्रकारची तिकिटं उपलब्ध करून दिली.

- Advertisement -

तासाभरात सगळी तिकिटं वेटिंगवर!

सकाळी १० वाजता तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर पहिल्या ३ तासांमध्येच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या लोकांनी मुंबई ते खेड, रत्नागिरी, पुणे, सोलापूर अशा आंतरजिल्हा प्रवासाची तिकिटं बुक केली. इतकी की पहिल्या तासाभरात सगळी तिकिटं वेटिंगवर गेली. पण महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू असताना आंतरजिल्हा प्रवासावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना ट्रेनने देखील आंतरजिल्हा प्रवास करता येणार नाही हे स्पष्ट होतं. मात्र, हा गोंधळ लक्षात येईपर्यंत शेकडो लोकांनी तिकिटं बुक केली होती. दुपारी २३ वाजता रेल्वेने हा गोंधळ दूर करून महाराष्ट्रात आंतरजिल्हा तिकीटं बुक करण्याचा पर्याय काढून टाकला.

railway error
railway error

पण तोपर्यंत तिकिटं काढलेल्या प्रवाशांचं काय? तर या सगळ्या प्रवाशांची तिकिटं रद्द करण्यात येऊन त्यांना ऑनलाईन पद्धतीने तिकिटांची रक्कम परत मिळणार आहे. मात्र, रेल्वे किंवा राज्य सरकारांनी आधीच या गोष्टी लक्षात घेऊन सर्व नियमांची सविस्तर घोषणा केली असती, तर कदाचित इतका गोंधळ होऊन प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला नसता.

- Advertisement -

आंतरजिल्हा प्रवासामार्फत कोरोना विषाणूचा फैलाव होत असेल तर तो आंतरराज्य प्रवासातही होतो. परंतु, आंतरराज्य प्रवासावर कोणतेही निर्बंध नाहीत. रेल्वे प्रवाशास आणि राज्य सरकारच्या कामात सुसंगती नाही. हे समन्वयाच्या अभावामुळे होत आहे कि राजकीय मतभेद कारणीभूत आहेत? शासनाने याची दखल घेतली पाहिजे.

हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

महाराष्ट्रात जिल्हांतर्गत प्रवासाला परवानगी नव्हती तर तशा सूचना राज्याने रेल्वेला आणि रेल्वेने प्रवाशांना वेळीच देणे गरजेचे होते. ह्याबद्दल प्रवाशांना कोणतीच आगाऊ सूचना न मिळाल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. कोरोनामुळे उद्भवलेल्या आणीबाणी सदृश्य परिस्थितीत केवळ यंत्रणामधील समन्वयाच्या आणि संवादाच्या अभावामुळे लोकांची अशी फरफट होणे दुर्दैवी घटना आहे.

अक्षय महापदी, प्रवासी, कळवा, ठाणे

मुंबईतून सुटणाऱ्या गाड्या

०१०१६-१५ एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस, ०१०१९-२० एलटीटी-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, ०१०६१-६२ एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस, ०१०७१-७२ एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, ०१०९३-९४ सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, ०११३९-४० सीएसएमटी- गडग एक्स्प्रेस, ०१३०१-०२ सीएसएमटी-केएसआर बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस, ०२४७९-८० बांद्रा टर्मिनस-जोधपुर सूर्यनगरी एक्स्प्रेस, ०२५३३-३४ सीएसएमटी-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस, ०२७०१-०२ सीएसएमटी-हैद्राबाद हुसेनसागर एक्स्प्रेस, ०२८१०-०९ सीएसएमटी-हावडा मेल, ०२९०३-०४ मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल मेल, ०२९२६-२५ बांद्रा टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस, ०२९३३-३४ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद कर्नावती एक्स्प्रेस, ०६३४५-४६ एलटीटी-तिरुअनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस अशा अनेक गाड्य मुंबईतून जात आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -