घरताज्या घडामोडीदहा दिवसांत २४९ कोटींचे पीककर्ज वाटप

दहा दिवसांत २४९ कोटींचे पीककर्ज वाटप

Subscribe

शेतकर्‍यांना खरिप हंगामासाठी तातडीने पीककर्ज उपलब्ध व्हावे याकरीता जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत दर आठवडयाला बँकांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यानूसार गेल्या दहा दिवसांत २४९ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याची माहीती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

मे अखेरीस झालेल्या खरिप हंगाम बैठकीत पीककर्जाचा आढावा घेण्यात आला असता अवघ्या ४१ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात होते. याबाबत नाराजी दर्शवण्यात आली. खरिप हंगाम अगदी तोंडावर आला असून राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांनी दिलेल्या उदिदष्टापैकी किती कर्ज वाटप केले याचा दर आठवडयाला आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानूसार गेल्या आठवडयांपासून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेत पीककर्जाचा आढावा घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्याला खरीप हंगामासाठी ३३०० कोटी रूपये पीक कर्ज वाटपाचे उदिदष्ट देण्यात आले आहे. गेल्या आठवडयात यात वाढ होउन १३१ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले. त्यानंतर बुधवारी दि.४ रोजी झालेल्या बैठकीत २४९ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याची माहीती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार २३७ शेतकर्‍याना १४४५.९८ कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकांमुळे लागू झालेली आचारसंहिता व त्यानंतर लॉकडाऊनमुळे कर्जमाफीची रक्कम बँकेत जमा होऊ शकली नाही. एकूणच कामकाज थंडावल्याने पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. या सर्वांचा परिणाम कर्ज वाटपावर झाला. मात्र कर्जमाफीस पात्र लाभार्थ्यांना कर्ज वाटपाबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यानूसार बँकांनी कर्जवाटप सुरू केले आहे. कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बँकांचे उदिदष्ट सर्वाधिक आहे. राष्ट्रीयकृत बँकांना २२४३ कोटींचे उदिदष्ट देण्यात आले आहे. त्यातही सर्वाधिक उदिदष्ट असलेल्या ‘टॉप टेन’ राष्ट्रीयकृत बँकांना कर्जवाटप कसे करणार याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याबाबतचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

आतापर्यंत २४९ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यावेळी बँकांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. ज्या अडचणी स्थानिक स्तरावर सोडवणे शक्य आहे त्या तातडीने सोडवल्या जातील. तर राज्यस्तरावरील अडचणींबाबत शासनाला कळविले जाईल. गतवर्षीही कर्जवाटपात जिल्हा पाचव्या क्रमांकावर होता. यंदाही त्याप्रमाणे नियोजन करण्यात येउन शेतकर्‍यांना कर्जवाटप करण्यात येउन उदिदष्ट पूर्ण केले जाईल. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या निर्देशानूसार कर्ज वाटप करण्यात येणार आहे.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -