घरCORONA UPDATEमहापालिकेचा के-पूर्व विभाग कोरोनाग्रस्तांच्या यादीत लवकरच पहिल्या स्थानावर

महापालिकेचा के-पूर्व विभाग कोरोनाग्रस्तांच्या यादीत लवकरच पहिल्या स्थानावर

Subscribe

रुग्णालयात दाखल करण्यास विलंब होत असेल तर त्यापूर्वी ऑक्सिजन आर्मीच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत या विभागातील सुमारे १२५ हून जणांचे जीव वाचवण्यात यशस्वी ठरलेला हा प्रभाग आहे.

कोरोनाची लागण सुरु झाल्यानंतर सुरुवातीला पहिल्या दहामध्ये असणाऱ्या या जोगेश्वरी, अंधेरी पूर्व व विलेपार्ले या तिन विधानसभा क्षेत्रांचा समावेश असलेला के-पूर्व विभाग आता कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत दुसरा क्रमांकावर आहे. मात्र, ज्याप्रमाणे रुग्ण दरवाढीचे प्रमाण वाढत आहे, ते पाहता हा विभाग लवकरच कोरोनाग्रस्तांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर लवकरच येईल. मात्र, बाधित रुग्णांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास, रुग्णालयात दाखल करण्यास विलंब होत असेल तर त्यापूर्वी ऑक्सिजन आर्मीच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत या विभागातील सुमारे १२५ हून जणांचे जीव वाचवण्यात यशस्वी ठरलेला हा प्रभाग आहे. सुरुवातीपासून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत हा आजार नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न या विभागाने केला असला तरी सर्व प्रकारचे रुग्ण याच विभागात असल्याने रुग्णवाढीचा दर वाढताना दिसत आहे.

विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व या महापालिकेच्या के-पूर्व  विभागात विलेपार्ले, अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी हे तीन विधानसभा क्षेत्र मोडत आहे. एवढे मोठे परिक्षेत्र असलेल्या या एकमेव विभागाचे काम मार्चच्या पहिल्या तारखेपासूनच सुरु झाले. विमानतळ या विभागाच्या हद्दीत येत असल्याने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना  विमानतळावर तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम या विभागाच्या माथ्यावरच होते. इतर सर्व विभाग लॉकडाऊननंतर खऱ्याअर्थाने कामाला लागले असले तरी के-पूर्व विभाग हा फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेपासून कोरेानाच्या उपाययोजना राबवण्यासाठी झटत आहे.

- Advertisement -

११ एप्रिलपर्यंत या विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ एवढी होती. परंतु दोन महिन्यांत या विभागात ३४००एवढी रुग्ण संख्या पोहोचली आहे.  रुग्णसंख्येत हा विभाग सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मरोळ पाईपलाईन इंदिरा नगर, लेलेवाडी, साईनगर, सहाररोड,  गुंदवली गावठाण, मरोळ, नटवरनगर, एमआयडीसी, चकाला, सहारगाव, बामनवाडा, नवपाडा, नेहरु नगर, मालपा डोंगरी, शास्त्री नगर, पारशीवाडा, काजूवाडा, वांद्रेकरवाडी, रामवाडी, गांधी नगर, सारीपूतनगर, प्रेमनगर आदी भागांमध्ये सर्वांधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले.

विमानतळावरील प्रवाशी,वंदे भारत अंतर्गत येणारी विमान प्रवाशी, विमानतळावरील कामगार, बोटीवरुन येणारे प्रवाशी, जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालय, सेव्हनहिल्स रुग्णालय येथील कोरोनाचे रुग्ण तसेच ७० टक्के झोपडपट्टी परिसर याच विभागात आहे. त्यामुळे यासर्व परिस्थितीमध्ये रुग्णांचा आकडा फुगलेला दिसला तरी यासर्व बाबींचा विचार करता स्थानिक बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणातच आहे. मागील दहा दिवसांपासून या भागातील रुग्ण दरवाढीचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या सरासरी रुग्ण दरवाढीच्या तुलनेत येथील रुग्ण दरवाढीचे प्रमाण ४ टक्यांवर आलेल आहे. त्यामुळे रुग्ण दरवाढीचे प्रमाण असेच कायम राहिल्यास सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेला हा विभाग पहिल्या क्रमांकावर आल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisement -

या विभागात परिमंडळ उपायुक्त पराग मसुरकर यांच्या संकल्पनेतून अनोख्या पध्दतीने सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन केले जात आहे. एवढेच नाहीतर या विभागातील प्रत्येक नगरसेवकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनचे यंत्र उपलब्ध करून दिले आहे. ज्याद्वारे रुग्णाला दाखल करण्यास विलंब होत असेल तर तोपर्यंत त्यांचे ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जाईल. त्यामुळे विभागात कोरेानाचा आजार रोखण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे.

या विभागात शास्त्री नगर आता शांत झाला असला मालपाडोंगरी,वांद्रेकरवाडी, राम नगर डोके वर काढत आहे. सार्वजनिक शौचालयांमध्ये ‘झुनो’ या रासायनिक द्रव्याचा वापर करून सॅनिटायझेशन सुरुच आहे. तर शौचालयांमध्ये उपायुक्त पराग मसुरकर यांच्या संकल्पनेतून आम्ही सॅनिटायझेशनचा नवीन प्रयत्न केला आहे. यामध्ये प्रत्येक शौचालयांमध्ये सोडियम हायपोक्लोराईड मिश्रित पाण्याचा ड्रम ठेवण्यात आला आहे. यातील पाणी शौचकुपातील आसनांवर प्रत्येकाने टाकायचे आहे. त्यामुळे अशाप्रकारचे सॅनिटायझेशन हे प्रभावी ठरताना दिसत असल्याचे के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी स्पष्ट केले.

याशिवाय अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि विशेष कार्य अधिकारी रामास्वामी यांच्या संकल्पनेतून ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन’ अर्थात ‘ऑक्सिजन आर्मी’ आम्ही विभागातील १५ नगरसेवकांना उपलब्ध करून दिले आहेत. ज्याद्वारे एखाद्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल कमी होवून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत, अशा वेळी या ‘ऑक्सिजन आर्मीचा’ वापर करून त्यांची ऑक्सिजन लेवल मेंटेन करता येते. याचा वापर कसा करावा याचा व्हिडीओ आम्ही डॉक्टरांकडून तयार करून घेतला.  त्यामुळे एखाद्या रुग्णाला धाप लागत असेल आणि रुग्णालयात दाखल करण्यास विलंब होत असेल तर तोपर्यंत या ऑक्सिजन आर्मीच्या माध्यमातून त्यांना प्राथमिक उपचार केले जातील. ऑक्सिजन लेवल वाढल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. अशाप्रकारे गोल्डन अवर्समध्ये अशाप्रकारे प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आतापर्यंत १२५ हून रुग्णांचे जीव वाचवू शकलो,असेही सपकाळे यांनी सांगितले.

माझ्या प्रभागात सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग अधिक पसरला होता. आता हे प्रमाण फार कमी आहे. आतापर्यंत १२२ बाधित रुग्ण झाले आहेत. मरोळ पाईप लाईन परिसर कोरोनाचा प्रमुख अड्डा बनला होता. परंतु मागील अडीच महिन्यांपासून आपण प्रचंड मेहनत घेत आहे. सॅनिटायझेशनसह घरोघरी जावून लोकांची तपासणी केली. मात्र, या विभागातील सहार पोलिस ठाण्यातील सर्वात जास्त पोलिस कोरोनाग्रस्त झाले. तर स्वयंसेवकांसह आरोग्य सेविकाही बाधित झाल्या. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ऑक्सिजन आर्मी मशिनरीच्या माध्यमातून आतापर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या १० ते १२ रुग्णांना मदत पोहोचवू शकलो. सेव्हन हिल्स जरी मरोळमध्ये असले तरी याठिकाणी आमच्या रुग्णांना त्वरीत खाट मिळत नाही. त्यामुळे कधी ट्रामा तर कधी कुपर रुग्णालयात हातपाय जोडून व्यवस्था करावी लागते.

– जगदीश अमिन कुट्टी, स्थानिक नगरसेवक, काँग्रेस

आतापर्यंत विभागात बाधित रुग्णांची संख्या ३५वर पोहोचली आहे. विभागासह सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन दैनंदिन केले जाते. मात्र, हा आजार  नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीत जास्त चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी रॅपिट टेस्टलाही मान्यता दिल्यास या आजाराचा प्रसार रोखण्यात यशस्वी होईल. महापालिकेने ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स उपलब्ध करून दिले. परंतु संबंधित रुग्णांना कोरोना झाला असल्यास आमच्याही कार्यकर्त्याला होईल. त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून मी अजुन त्याचा वापर केला नाही.

– नितीन सलाग्रे, स्थानिक नगरसेवक, काँग्रेस

मोगरापाडा आणि फ्रान्सिस याठिकाणी काही कोरेानाचे रुग्ण होते. फ्रान्सिसवाडीचा कंटेन्मेंट झोन आता मोकळा केला. परंतु सध्या कोविडबरोरबच नॉन कोविडच्या रुग्णांना दाखल करताना मोठी दमछाक होते.खासगी रुग्णालये दाखलच करून घेत नाही. महापालिकेने आम्हाला दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या माध्यमातून आतापर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून दहा ते बारा रुग्णांचे जीव वाचवले आहेत. आज कुठल्या भागात कमी आणि कुठल्या भागात जास्त रुग्ण यापेक्षा संपूर्ण मुंबईचा विचार होणे गरजेचे आहे. मात्र, सध्याची मुंबईची परिस्थिती पाहता भयानक असून सामान्य माणूस हे स्वीकारायला लागले,पण सरकार आणि प्रशासन हे स्वीकारायला तयार नाही ही दुर्दैवी बाब आहे.

– पंकज यादव, स्थानिक नगरसेवक,भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -