घरक्रीडाअवघ्या सात मिनिटांत झाली भारताच्या प्रशिक्षकपदी निवड!

अवघ्या सात मिनिटांत झाली भारताच्या प्रशिक्षकपदी निवड!

Subscribe

गॅरी कर्स्टन यांनी सांगितला किस्सा

प्रशिक्षक बनण्याची जराही इच्छा नसताना आणि प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला नसतानाही गॅरी कर्स्टन यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली, तीही अवघ्या सात मिनिटांत! २००७ मध्ये ग्रेग चॅपल यांचा करार संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ नव्या प्रशिक्षकांच्या शोधात होता. प्रशिक्षक नेमण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीमध्ये भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचाही समावेश होता. त्यांनी पुढाकार घेत कर्स्टन यांना प्रशिक्षकपदासाठी मुलाखत देण्यास तयार केले. पुढे जाऊन कर्स्टन यांच्याच मार्गदर्शनात भारताने २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

मला सुनील गावस्कर यांनी ईमेल पाठवला. तुला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनायला आवडेल का, असे त्यात त्यांनी विचारले. मला वाटले की चुकून तो ईमेल मला आला आहे. त्यामुळे मी त्याला उत्तर दिले नाही. त्यानंतर गावस्कर यांनी मला आणखी एक ईमेल केला. तू प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी येऊ शकतोस का?, असे त्यात त्यांनी लिहिले होते. मी तो ईमेल पत्नीला दाखवला आणि तिलासुद्धा तो ईमेल चुकून आला असेच वाटले. सर्वच गोष्टी जरा विचित्र होत्या. प्रशिक्षक म्हणून मी त्याआधी कधीही काम केले नव्हते, असे कर्स्टन म्हणाले.

- Advertisement -

अखेर मी मुलाखत देण्यासाठी गेलो आणि माझ्यासमोर त्यावेळच्या भारतीय संघाचा कर्णधार अनिल कुंबळे होता. तू इथे काय करत आहेस, असे त्याने मला विचारले. मी तुझा प्रशिक्षक बनण्यासाठी मुलाखतीला आलो आहे, असे मी त्याला म्हणालो आणि आम्ही दोघेही हसू लागलो. त्यानंतर माझी बीसीसीआयच्या अधिकार्‍यांसोबत बैठक सुरु झाली. भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने माझ्या योजना मांडण्यास बोर्डाच्या सचिवांनी सांगितले. परंतु, माझ्याकडे योजनाच नव्हती. मी कोणत्याही तयारीविनाच मुलाखतीसाठी गेलो होतो, असेही कर्स्टन म्हणाले.

तसेच त्यांनी पुढे सांगितले, रवी शास्त्री हेसुद्धा त्या समितीचा भाग होते. गॅरी, तुमचा दक्षिण आफ्रिकन संघ भारताला पराभूत करण्यासाठी काय विशेष तयारी करतो, असे शास्त्री यांनी मला विचारले. तो प्रश्न माझ्यासाठी फायदेशीर ठरला. मी दोन-तीन मिनिटांत पूर्ण माहिती न सांगताही त्या प्रश्नाचे उत्तर दिले. माझ्या उत्तराने बोर्डाचे सर्व सदस्य प्रभावित झाले. मुलाखत सुरु होऊन साधारण सात मिनिटे झाल्यानंतर बोर्डाच्या सचिवांनी माझ्यासमोर करार ठेवला. कराराच्या पहिल्या पानावर ग्रेग चॅपल यांचे नाव होते. तुम्ही मला माजी प्रशिक्षकांचा करार दिला आहे, असे मी त्यांना सांगितले. मात्र, हे त्यांना फारसे आवडले नाही. त्यांनी पेनाने चॅपल यांचे नाव खोडले आणि त्यावर माझे नाव लिहिले. अशाप्रकारे मी भारताचा प्रशिक्षक झालो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -