घरफिचर्सकोरोना आणि अडाण्यांचा गचाळपण

कोरोना आणि अडाण्यांचा गचाळपण

Subscribe

काही आठवड्यांपूर्वी  मनसेप्रमुख राज ठाकरे मंत्रालयात चेहऱ्यावर मास न लावता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेले होते. त्याचा अनेकांनी निषेध करत त्यांना ट्रोल केले होते. असे अनेक भागाभागातले राज ठाकरे चेहऱ्यावर मास्क न लावता फिरताना दिसतायत. असा आता कोणी आढळला तर १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. मुंबईसह राज्यभरात पालिका आणि जिल्हा प्रशासनाला आता मास्क न लावता फिरणारे, शारिरीक अंतर न पाळणारे अडाणी, जागोजागी पिचकाऱ्या मारणारे, वाटेल तिथे आपापले विधी उरकून परिसर गचाळ करणारे, यांच्या विरोधात जोरदार मोहीम छेडून त्यांना जेरीस आणायला हवे. करोनाला भविष्यासाठी थोपवायची तीच तर मुख्य पायरी आहे. तिथेच उसळी मारणारा करोना थांबवायला हवा. पण ते कुणा एकाच काम नाही. त्याची सुरुवात प्रत्येकानं स्वत: पासून करायला हवी.

मी रहात असलेल्या दोनशे फ्लॅट्सच्या कॉम्प्लेक्समध्ये प्रामुख्याने डॉक्टर, वकील, साहित्यिक, माध्यमकर्मी आणि सरकारी अधिकारी अशी उच्चमध्यम वर्गीयांची वस्ती आहे. लॉकडाऊन-२ पासूनच काही सुशिक्षित तरुण आमच्या इमारतीच्या खालील पार्किंगमध्ये तासनतास गप्पा मारत, हास्यविनोद करीत असत. त्यातील अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नसत. शारीरिक दूरीही नसायची. यातले तरुण सुशिक्षित होते. कुणी सीएची तयारी करतोय तर कुणी इंजिनिअरिंग करतोय, कुणी एमएनसीमध्ये नोकरीला आहे. त्यांच्याकडून हा प्रकार खूप वाढल्यानंतर मी त्यांना थोडं प्रेमळ नाराजीने मास्क लावायची ‘विनंती’ केल्यावर त्यातला एकजण मला म्हणाला, ‘अहो, मास्क लावला नाही तर काही होत नाही. मास्क लावला तर करोना होणार नाही असंही काही नाही.’ यावर मी त्याला म्हटलं, अरे, बाबा इन्शुरन्स उतरवला म्हणजे अपघात होणारच नाही असं समजायचं का? नाही ना. तो सावधानतेचा उपाय म्हणून आपण करतो ना. तसंच आहे.’  या समजावण्याचा फार काही परिणाम या तरुणांवर झाला नाही. याबाबत पोलीसांत जाण्याचा उपाय माझ्याकडे होता. पण तो व्यक्तिगत कारणांमुळे मी टाळला. आणि परिणाम व्हायचा तोच झाला. ‘एस’ वार्ड मधील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये २७ जूनला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. त्यानंतर काही तासांत दुसरा. पहिल्या रुग्णाच्या घरातील तरुण या गप्पा-टप्पांमधला सक्रिय सदस्य… त्यानंतर अवघ्या काही तासांतच दुसरा रुग्ण सापडला…
मुंबईच्या उपनगरातील ही समस्या. ३० जूनला देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत खंत व्यक्त केली. अनलॉक-१ नुसार काही सवलती मिळताच काहींनी चेहऱ्यावरील मास्क काढून फिरायला सुरवात केली. तर काहींनी अत्यावश्यक खरेदीसाठी सहकुटुंब जायला सुरुवात केली. लोकं चाळींच्या आणि वस्त्यांच्या बाहेर काळजी न घेताच रेंगाळायला लागले, गप्पा मारायला लागले आणि व्हायचं तेच झालं. वरळी-धारावी सारखी स्थिती मुंबई परिसरातील, भांडूप, कुर्ला, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाडसह उत्तर मुंबईत मोठ्या प्रमाणात दिसायला लागली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातील रुग्णांची संख्या झपझप वाढायला लागली. हा सगळा परिसर चाळींचा आणि दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपडपट्टयांचा. भांडूप मुंबईमध्ये बाधितांच्या संख्येत चौथ्या क्रमांकावर आला. इथला पश्चिमेला असलेल्या भट्टीपाडा, टेंबीपाडा, नरदास नगर, खिंडीपाडा भागात शौचालयांची समस्या आहेच पण त्याही पेक्षा लोकांमधील बेशिस्त आणि गचाळपणा कमालीचा आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांच्या बाबतीतही हीच कारणं.तर मुलुंड सारख्या सुशिक्षितांच्या भागात, ठाणे पश्चिमेच्या बहुभाषिकांच्या भागात रोजची खरेदी आणि नियम मोडून जगणं अनेकांना भोवलंय.
भांडूपच्या आमदारांच्या आईचं दुःखद निधन करोनामुळे झालंय तर ठाण्यातले मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार रवींद्र फाटक त्यांच्या पत्नीसह करोनावर उपचार घेऊन, बरे होऊन घरी परतले आहेत. पिंपरीतले आमदार महेश लांडगे आणि त्यांची पत्नी करोनावर उपचार घेत आहेत. करोना फक्त गरीबांनाच होतोय किंवा झोपडपट्टीतल्यांनाच होतोय असं समजण्याचं काहीच कारण नाही. जसा तो भांडुप सारख्या उपनगरातल्या दाट वस्तीतल्या इमारतीत होतोय तसा तो उद्योगपती रतन टाटांच्या मलबार हिलच्या पॉश इमारतीतल्या उद्योगपतीलाही झाला आहे. करोनाचं थैमान पाहून रतन टाटांनी दीड हजार कोटींच्या देणग्या वेगवेगळ्या ठिकाणी दिल्या. ते म्हणाले, “२०२० सालांत बाकी काही करण्यापेक्षा, नफा-तोटा बघण्यापेक्षा पुढच्या वर्षी पर्यंत आपण कसं जगणार हेच सगळ्यांनी बघायला हवं.” त्याच टाटांच्या इमारतीत अनेकांना करोनाची लागण झाली. तेव्हा याही वयात आपल्या अनेक शेजाऱ्यांसाठी टाटांनी धावपळ केली.
अनलॉक-२ च्या घोषणेच्या वेळी मोदींनी नागरिकांच्या बेशिस्तीमुळे व्यक्त केलेली भिती हाच खरा आता चिंतेचा मुद्दा आहे. इटली किंवा लॉस एंजलिसमध्ये सुद्धा असंच झालं. लॉकडाऊन संपल्यावर लोकांनी समुद्र किनाऱ्यावर आणि पार्कात जी गर्दी केली त्याची किंमत त्या त्या ठिकाणच्या लोकांनी चुकवली आहे. रुग्णांना आपले प्राण मोठ्या संख्येने गमवायला लागलेत ते होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनीच आपापली काळजी घेण्याची गरज पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी बोलून दाखवली आहे. जसा कोरोना वाढतोय तशी त्याची लक्षणंही वाढतायत. महापालिका, जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक संस्था यांच्यात अभूतपूर्व गोंधळ आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये राजकारण सुरु आहे. औषध संशोधकांमधला गोंधळ आहेच. या सगळ्याचा परिणाम उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सहन करावा लागतोय. त्यांचे अथक प्रयत्न सुरु आहेत. तरीही बळींची संख्या वाढतेय. आतापर्यंत देशभरात सुमारे १७ हजारांचे बळी गेले आहेत. आता ही संख्या थोपवणं कोणत्याही नेत्यापेक्षा किंवा सरकार पेक्षा नागरिकांच्या हातातच प्रामुख्याने आहे.
अनलॉक-२ चा टप्पा सुरु झालाय. करोनाच्या बाबत सर्वात भितीदायक असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या ७०० फेऱ्या सुरु झाल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यात प्रवेश देण्यात आलाय. परप्रांतिय मंजूर पुन्हा मुंबई पुण्यात परतायला लागले आहेत. यात कोरोना उसळी मारण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांपासून बिल्डरांपर्यंत सगळ्यांचीच कामे खोळबंली आहेत. प्रत्येकालाच आपापली कामं लगबगीनं पूर्ण करायची आहेत. त्यासाठी साहजिकच मंत्र्यांना गराडे पडत आहेत. यात सर्वात आघाडीवर आहेत जितेंद्र आव्हाड, अजित पवार आणि एकनाथ शिंदे. यापैकी आव्हाड अक्षरशः मृत्युला भोज्या करुन आलेत. असं वाटलं होतं ते अधिक काळजी घेतील. त्यांना कामानं झपाटलंय. त्यांच्या दोन्ही बंगल्यांवर कामं घेऊन येणारे आणि अधिकाऱ्यांची तोबा गर्दी असते. तासनतास आव्हाड आणि गृहनिर्माण मंत्रालयातील आणि म्हाडातील अधिकारी जत्रा भरवून कामं करत असतात. त्यांच्या मतदार संघातील अनेकांना संसर्ग झाला, काही कसे लढलो याच्या सुरस कथा ऐकवत असतात. या सगळ्या दरबारबाजीत स्वत: मंत्र्यांनी आचारसंहितेतून काम करायला हवं. कारण कामं आणणारे विकासक, आर्किटेक्ट, कंत्राटदार फक्त आपलं काम जाणतात. ते आव्हाड करतात की पवार की ठाकरे याच्याशी त्यांना देणंघेणं नसतं. त्यामुळे आव्हाड असोत किंवा शिंदे. त्यांनी स्वत:ची  कुटुंबियांची आणि शहराची काळजी घ्यायला हवी.
आता सध्या ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात १० जुलै पर्यंत लॉकडाऊन-१ सारखी कडक टाळेबंदी करण्यात आली. त्यातही राजकीय कलगीतुरा रंगला. हे न होता या नेत्यांनीच आता चेल्याचपाट्यांना झटकायला हवं. कारण सध्या सगळीकडेच चहापेक्षा किटली गरम असल्याचं अनुभवायला मिळतं आहे. काही आठवड्यांपूर्वी  मनसेप्रमुख राज ठाकरे मंत्रालयात चेहऱ्यावर मास न लावता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेले होते. त्याचा अनेकांनी निषेध करत त्यांना ट्रोल केले होते. असे अनेक भागाभागातले राज ठाकरे चेहऱ्यावर मास्क न लावता फिरताना दिसतायत. असा आता कोणी आढळला तर १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. मुंबईसह राज्यभरात पालिका आणि जिल्हा प्रशासनाला आता मास्क न लावता फिरणारे, शारिरीक अंतर न पाळणारे अडाणी, जागोजागी पिचकाऱ्या मारणारे, वाटेल तिथे आपापले विधी उरकून परिसर गचाळ करणारे, यांच्या विरोधात जोरदार मोहीम छेडून त्यांना जेरीस आणायला हवे. करोनाला भविष्यासाठी थोपवायची तीच तर मुख्य पायरी आहे. तिथेच उसळी मारणारा करोना थांबवायला हवा. पण ते कुणा एकाच काम नाही. त्याची सुरुवात प्रत्येकानं स्वत: पासून करायला हवी.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -