घरफिचर्सनवे आहेत पण छावे आहेत

नवे आहेत पण छावे आहेत

Subscribe

भालाफेक हा खेळ तसा म्हटला तर फार लोकप्रिय नाही. परंतु, काही देश असे आहेत ज्यात या खेळाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर आहे. पण भारत त्यापैकी एक नाही. तरीही नीरज चोप्रा या अवघ्या २० वर्षीय खेळाडूने संपूर्ण जगाला आणि विशेष म्हणजे भारतीयांना आपल्या खेळाची दाखल घ्यायला लावली आहे.

भालाफेक हा खेळ तसा म्हटला तर फार लोकप्रिय नाही. परंतु, काही देश असे आहेत ज्यात या खेळाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर आहे. पण भारत त्यापैकी एक नाही. तरीही नीरज चोप्रा या अवघ्या २० वर्षीय खेळाडूने संपूर्ण जगाला आणि विशेष म्हणजे भारतीयांना आपल्या खेळाची दाखल घ्यायला लावली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर आणखी एक नाव उदयाला येत आहे ते म्हणजे धावपटू करण हेगिस्टे याचे.

नीरज चोप्रा या खेळाडूने पाच वर्षांपूर्वी सगळ्यांना आपली दाखल घ्यायला लावली. कारण त्याची कामगिरीचं तशी होती. त्याने युक्रेन येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ६६.७५ मीटर भालाफेक करत १९ वे स्थान मिळविले. हे १९ वे स्थान तसे म्हटले तर प्रभावी करणारे नव्हते. पण या खेळाडूकडे काहीतरी वेगळी जादू आहे हे मात्र लोकांना लक्षात आले होते. त्याच नीरज चोप्राने पुढील दोन वर्षांत जोरदार मेहनत करून दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आणि आपण यापुढे भालाफेकमध्ये खूप मोठे नाव कमावणार हे दाखवून दिले.
नीरजचा जन्म हरियाणाच्या पानिपत येथील खंडारा गावात झाला. गावात जेमतेम ५०० कुटुंब. त्यापैकी त्याचे एक. निरजच्या घरात १७ सदस्य होते. लहानपानपासूनच नीरजला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. लहानपणी तो जरा लठ्ठ होता. त्यामुळे त्याला लोकं त्याच्या लठ्ठपणावरून चिडवत. त्याला खेळात खूप रस. पण त्याच्या गावात एकही मैदान किंवा व्यायामशाळा नव्हती. पण नीरज यामुळे हताश झाला नाही. याचे मुख्य कारण होते त्याचे वडील. त्याच्या वडिलांनी त्याला खूप प्रोत्साहन दिले. त्यामुळे नीरजने आपल्या खेळाला त्यांच्या शेतीतूनच सुरुवात केली. मग हळूहळू त्याला एका व्यायामशाळेचाही शोध लागला. त्याने तिकडे जाऊन आपला सराव सुरू केला.

- Advertisement -

तिथपासून नीरजच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. इथे नीरजला त्याचे पहिले प्रशिक्षक जयवीर भेटले. ते स्वतः एक भालाफेकपटू होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नीरजने आपले पहिले राष्ट्रीय पदक जिंकले. यापुढे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकायला फार काळ लागला नाही. त्याने २०१६ दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. तर २०१६ मध्ये नीरजने पोलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील विश्व चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या पहिल्या सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तसेच त्याने ज्युनिअर विश्वविक्रमही प्रस्थापित केला. असे असूनही २०१६ ला झालेल्या रिओ ऑलिम्पिकसाठी तो पात्र होण्यास अपयशी झाला. ऑलिम्पिक पात्रतेसाठी ८३ मीटरचे अंतर पार करणे आवश्यक असते. परंतु, नीरजला ते करता आले नाही. या गोष्टीमुळे निराश न होता, त्याने आणखी जोमाने सराव सुरू केला. याचे फळ त्याला २०१७ आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मिळाले, ज्यात त्याने ८५.२३ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. तर २०१८ राष्ट्रकुल स्पर्धा ही नीरजसाठी अविस्मरणीय राहिली. ही त्याची पहिलीवहिली राष्ट्रकुल स्पर्धा होती. त्यातही त्याने सुवर्ण पदक मिळवले. त्यामुळे भालाफेकमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला.

पुढे मे २०१८ मध्ये कतार येथील डोहा डायमंड लीगमध्ये त्याने पुन्हा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. ज्यात त्याने ८७.४३ मीटर लांब भाला फेकला. हल्लीच फिनलंड येथे झालेल्या सोवो स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदकाची कमाई केली. त्यामुळे यावर्षीच्या एशियाडमध्येही नीरजकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. इथे आंतरराष्ट्रीय स्तरावर नीरज भारताचा झेंडा फडकावत असताना राष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्रातून एक नवा खेळाडू नावारूपाला येत आहे. त्याचे नाव करण हेगिस्टे. करण अवघा १६ वर्षांचा धावपटू आहे. गेल्या काही काळापासून एका मागून एक पदकं मिळवत त्याने आपल्या नावाची छाप उमटवली आहे. आपल्या वयोगटातील सर्वोत्तम धावपटू म्हणून सध्या तो ओळखला जात आहे. करणचे आई-वडील दोघेही माजी खेळाडू. तो विरारचा रहिवासी. करणला लहानपणापासूनच खेळाची प्रचंड आवड.

- Advertisement -

त्याने आपल्या खेळाच्या कारकिर्दीची सुरुवात क्रिकेटपासून केली. पण हळूहळू त्याला अ‍ॅथलेटिक्समध्ये रस निर्माण झाला. त्यामळे ३ वर्षपूर्वी तो दहिसरच्या व्हीपीएम स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. तिथे त्याला संदर्श शेट्टी आणि संतोष आंब्रे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे दिवसेंदिवस त्याचा खेळ सुधारत गेला. त्याने ऑगस्ट २०१७ मध्ये भोपाळ येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत आपले पहिले राष्ट्रीय पदक पटकावले. या स्पर्धेच्या १०० मीटर प्रकारात त्याने रौप्य पदकाची कमाई केली. तर ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत करणने १०० मी. मध्ये कांस्य आणि २०० मी. रौप्य पदक पटकावले. इतकेच काय तर २०० मी. मध्ये २१.९९ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत त्याने राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. त्याने यावर्षी झालेल्या खेलो इंडियाच्या २०० मी.स्पर्धेत रौप्य आणि रिले प्रकारात सुवर्ण पदक कमावले. तसेच त्याने युथ स्टेट चॅम्पियनशिपमध्येही चांगले प्रदर्शन केले होते. एकूणच करणसाठी हे वर्ष चांगले राहिले आहे. त्याने या शैक्षणिक वर्षात तब्बल १६ पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे करणने जर आपला हा प्रवास यशस्वीरित्या सुरू ठेवला तर भविष्यात तो ऑलिम्पिकमध्येही पदक मिळवू शकेल यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -