घरक्रीडाBoxing Day Test: भारताचा ऑस्ट्रेलियावर 'अजिंक्य' विजय; मालिकेत बरोबरी

Boxing Day Test: भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘अजिंक्य’ विजय; मालिकेत बरोबरी

Subscribe

अॅडिलेड पराभवाच्या मेलबर्नमध्ये वचपा; ८ गडी राखून ऑस्ट्रेलियावर मात

अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने मेलबर्नवर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयाने पहिल्या कसोटी सामन्यातील लाजीरवाण्या पराभवाचा वचपा काढला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने भारताला ७० धावांचे माफक आव्हान दिलं होतं. हे विजयी आव्हान भारताने २ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

कर्णधार अजिंक्य रहाणेचं पहिल्या डावातील शतक आणि भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा ही टीम इंडियाच्या विजयाची वैशिष्ट्य ठरली. बॉक्सिंग-डे कसोटीत भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियावर वर्चस्व कायम राखले. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने मोठी आघाडी घेतली आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाची दिवसअखेर दुसऱ्या डावात ६ बाद १३३ अशी अवस्था केली. ऑस्ट्रेलियाकडे केवळ दोन धावांची आघाडी होती. पहिल्या कसोटीत ३६ धावांच्या नीचांकाची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत मात्र फलंदाजीत सुधारणा केली. भारताने पहिल्या डावात ३२६ धावा केल्याने भारताला १३१ धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची अडखळती सुरुवात झाली. उमेश यादवने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्सला चौथ्या षटकातच माघारी पाठवलं. मॅथ्यू वेड आणि मार्नस लबूशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, रविचंद्रन अश्विनने लबूशेनला (२८) माघारी पाठवत ही जोडी फोडली. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथही फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याचा ८ धावांवर जसप्रीत बुमराहने त्रिफळा उडवला. एका बाजूने विकेट जात असताना वेडने सावध फलंदाजी सुरु ठेवली. त्याने १३७ चेंडू खेळून काढत ४० धावा केल्या. मात्र, त्याला रविंद्र जाडेजाने बाद करत ऑस्ट्रेलियाला आणखी एक झटका दिला. जाडेजानेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला केवळ एका धावेवर बाद केले. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ६ बाद १३३ अशी धावसंख्या होती आणि त्यांच्याकडे केवळ दोन धावांची आघाडी होती.

- Advertisement -

कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या सत्रात चांगलंच झुंजवलं. अखेरीस कमिन्सला बाद करत बुमराहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने कॅमरुन ग्रीनही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४५ धावांची खेळी केली. सातव्या विकेटसाठी ग्रीन आणि कमिन्स यांच्यातील ५७ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत कांगारुंचा दुसरा डाव २०० धावांवर संपवला. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ३, बुमराह-आश्विन आणि जाडेजा या अनुभवी त्रिकुटाने प्रत्येकी २-२ तर उमेश यादवने १ बळी घेतला.

विजयासाठी ऑस्ट्रेलियाने दिलेलं ७० धावांचं माफक आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या डावातही अवघ्या ५ धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजारालाही आपली छाप पाडता आली नाही. ३ धावा काढून पुजारा कमिन्सच्या गोलंदजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेने काही सुरेख फटके लगावत भारतीय संघावरच दडपण कमी केलं. यानंतर शुबमन गिलनेही काही चांगली फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप आणलं. अखेरीस रहाणे-गिल जोडीने अधिक पडझड न होऊ देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -