घरताज्या घडामोडीमराठा समाजाच्या नावाने राजकीय पक्षाला तीव्र विरोध!

मराठा समाजाच्या नावाने राजकीय पक्षाला तीव्र विरोध!

Subscribe

‘आपलं महानगर’च्या विशेष मुलाखतीत छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांची स्पष्ट भूमिका

मराठा क्रांती मोर्चांनंतर संघटीत झालेल्या समाजाचा राजकीय फायदा उठवण्यासाठी ज्यांना राजकीय पक्ष सुरु करायचा असेल, त्यांनी निश्चितपणे सुरु करावा. त्याला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. परंतु, मी बहुजन समाजाला संघटित करण्याचे कार्य करत असल्याने केवळ मराठा समाजाच्या नावाने होणार्‍या राजकीय पक्षाला माझे समर्थन नसेल किंबहुना त्यांनी माझ्या नावाचा वापरही करु नये, अशी स्पष्ट भूमिका छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी ‘आपलं महानगर’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये मांडली.

खासदार संभाजीराजे यांनी रविवारी (दि.3) ‘आपलं महानगर’च्या नाशिक कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, छत्रपती युवा सेनेचे अध्यक्ष गणेश कदम उपस्थित होते. खासदार संभाजीराजे म्हणाले की, शाहु महाराजांनी आरक्षणाची गरज प्रथमत: व्यक्त केली होती. त्याआधारे बहुजन समाजाला आरक्षणाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली. मराठा समाज हादेखील बहुजन समाजाचा घटक असल्याने त्यादृष्टीने समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आपली आग्रही भूमिका राहिली आहे. ज्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल, त्यानंतर मी समाजासोबत नसेल, तर बहुजन समाजासाठी काम सुरु करेन. त्यामुळे मराठा समाजाच्या नावाने राजकीय पक्ष सुरु करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांना नव्याने राजकीय पक्ष सुरु करावासा वाटतो, त्याला विरोध नाही; परंतु, त्यासाठी माझ्या नावाचा वापर कदापि होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

- Advertisement -

..म्हणून सारथी नेतृत्व पवारांकडे द्यावे

सारथी ही संस्था स्वायत्त व्हावी यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. छत्रपती शाहू महाराजांचे विचार जागवणारे ते जीवन स्मारक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असल्यामुळे त्यांनी हस्तक्षेप करुन या संस्थेची अवकळा दूर करायला हवी. तसेच त्या संस्थेत समाजासाठी काम करणार्‍या व्यक्तींचा समावेश असल्याशिवाय ही संस्था टिकणार नाही, म्हणून शरद पवारांनी सारथीचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -