घरपालघरडहाणू तालुक्यात युरियाचा तुटवडा

डहाणू तालुक्यात युरियाचा तुटवडा

Subscribe

खतदेखील उपलब्ध नाही

डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना टंचाईमुळे खतासाठी वणवण भटकावे लागत आहे. युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून कृषी विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे. डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात  शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून असल्यामुळे पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी वणवण फिरत असताना साधे खतदेखील उपलब्ध होत नाही. यातच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

गरज नसताना खते उपलब्ध असतात. मात्र, गरजेच्या वेळीच नेमका खतांचा तुटवडा निर्माण होतो यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.  तालुक्यात उन्हाळी भाताची लागवड सुरू असून आता भाताची आवणी चालू झाली आहे. भाताच्या वाढीसाठी युरियाची आवश्यकता असते. परंतु ऐन हंगामाच्यावेळी शेतकऱ्यांना खत मिळत नाही. मागच्या आठवड्यात काही दुकानांवर खत उपलब्ध झाले आहे. परंतु पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्यामुळे सर्वांना खत मिळावे ह्यासाठी सर्वाना कामचलाऊ पद्धतीने प्रत्येकी 2 गोणी या प्रमाणे खताचे वाटप करण्यात येत आहे.

- Advertisement -

त्यामुळेच  खतांच्या दुकानाबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. आदिवासी भागातील शेतकरी आता फक्त भातशेतीवर अवलंबून न राहता भाजीपाला लागवडीकडे वळतो आहे. डहाणू तालुक्यात मिरची, गवार, चवळी, तूर, वांगी, टोमॅटो, हरभरा, दुधी, गलका, भेंडी तसेच पालेभाज्यांमध्ये पालक,मेथी, कोथंबीर आदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते आहे. शेतकरी वर्ग रब्बी हंगामात व्यावसायिक शेतीकडे वळतो आहे. असे असताना शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध होत नसल्यामुळे नवीन शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.

ऐन हंगामाच्या वेळेस खते उपलब्ध होत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटते आहे. प्रत्येकी दोन गोणी युरिया दिले जाते. त्यामुळे मोठी शेती असलेल्या शेतकऱ्यांना खताचा तुटवडा निर्माण होत आहे. कृषी विभागाने यावर गांभीर्याने दखल घेत उपाययोजना करावी.
– शैलेश खेवरा, शेतकरी महालक्ष्मी

- Advertisement -

खत कंपनीसोबत असलेला वाहतूक करारासंबंधी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे विलंब होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कंपनीमध्ये छोट्यामोठ्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे अजून आठ दिवस खत उत्पादन बंद आहे. कंपनी चालू झाल्यावर सर्व सुरळीत सुरू होईल.
-सूरज जगताप, कृषी विकास अधिकारी, पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -