घरफिचर्समराठी भाषेचा दिखाऊ पुळका!

मराठी भाषेचा दिखाऊ पुळका!

Subscribe

मराठी भाषेविषयी अलीकडच्या काळात मराठीजनांकडून मोठा कळवळा व्यक्त करण्यात येत आहे. एका बाजूला आपली मराठी भाषा वाचली पाहिजे म्हणून एकमेकांना सांगितले आहे, पण त्याच वेळी बहुसंख्य मराठी लोक आपल्या मुलांना अतिरिक्त आर्थिक भार सोसूनही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालत आहेत. इंग्रजी भाषा आपल्याला चांगल्या प्रकारे यायलाच हवी, कारण आता आधुनिक संपर्क साधनांमुळे आपण जागतिक नागरिक झालेलो आहोत, पण हे करताना त्यात मराठी भाषेची पिछेहाट होेऊ नये. ही मराठीची तळमळ आहे की दिखाऊ पुळका?

आपली मातृभाषा ही प्रत्येकालाच प्रिय असते. प्रत्येकाला तिच्याविषयी आत्मियता आणि आपलेपणा वाटत असतो. आपल्या भाषेची गोडी अविट असते. आपली जन्मदात्री माता जी भाषा बोलते, ज्या भाषेतून ती आपल्याला पहिले बोल बोलायला शिकवते ती आपली मातृभाषा असते. भाषा हा माणसामाणसांमध्ये संवादाचा सेतू निर्माण करीत असते. भाषेतून आपल्याला आपल्या मनातील भावना दुसर्‍यापर्यंत कळवता येतात. आपल्या मनातील विचार कागदावर मांडता येतात. आता संगणकावर, तसेच समाजमाध्यमांवर मांडता येतात. एका भाषेतील माणसे एकमेकांच्या जास्त जवळ येतात. माणसांशी संपर्क आणि संवादासाठी भाषेची गरज असतेच, त्याचसोबत आपण अगदी पाळीव प्राणी आणि पक्ष्यांशी बोलताना भाषेचा वापर करतो. सरावाने ती त्यांना कळू लागते. पोपटासारखे पक्षी तर आपले ऐेकूण आपली भाषा बोलू लागतात. जगातील कुठल्याही माणसाला जी भाषा त्याने त्याच्या बालपणी शिकलेली असते, त्याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या एकूणच व्यक्तिमत्वावर असतो. त्यामुळे जीवनाच्या सुरूवातीच्या काळात जी भाषा आपण शिकतो, तीच आपली मातृभाषा असते. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून जे लोक राहत आहेत, त्यांची मातृभाषा मराठी आहे. महाराष्ट्रात बाहेरील प्रांतातून हे लोक येत असतात. इथे काही पिढ्या राहिल्यावर त्यांची मातृभाषा ही मराठी होऊन जाते. मातृभाषा ही आपण लहानपणापासून ऐकत, बोलत, शिकत असल्यामुळे त्याचे शब्द आणि संकल्पना आपल्या मनात स्थापित झालेल्या असतात. त्यामुळे जे कुठलेही अन्न आपण आपल्या हातांनी खातो तसेच जगातील कुठलाही विचार आपण आपल्या मातृभाषेच्या माध्यमातून जाणून घेत असतो. आपण आपल्या मातृभाषेच्या चष्म्यातून जगाकडे पाहत असतो. आपली मातृभाषा बोलणारा परप्रांतात कुणी आपल्याला भेटला की, आपल्या मनाला आनंद होतो. त्यामुळे मातृभाषा ही व्यक्तीसाठी झाडांच्या मुळासारखी असते, जसे झाडाची मुळे जमिनीतील पाणी आणि मूलद्रव्ये शोषून जमिनीच्या वरती वाढणार्‍या झाडाला पोहोचवतात. मातृभाषेचे आहे. मातृभाषा ही जगभरातील ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवत असते. त्यातून आपले मन आणि आपली मानसिकता यांचे पोषण होत असते.

महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे राहणार्‍या मराठी माणसांची मराठी ही मातृभाषा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते आणि लिहिली जाते. असे म्हणतात की, प्रत्येक दहा मैलांवर भाषेचा ढंग बदलत राहतो. तसाच महाराष्ट्रात काही विशिष्ट अंतरांवर मराठीचा ढंग बदलत राहत असला तरी महाराष्ट्रातील सगळी माणसे मराठी भाषेने जोडली गेली आहेत. मराठी भाषा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची भाषा आहे. त्यात तो सहजगत्या व्यक्त होऊ शकत असतो. एखाद्या भाषेचे महत्व वाढत जाते. त्यात विविध प्रकारचे साहित्य लिहिले जाते. याला स्थल, काल, परिस्थिती कारणीभूत असतात. कारण माणूस हा मुळात उपयुक्ततावादी आहे. जे त्याच्या सोयीचे असते, त्याचा तो पाठपुरावा करत असतो. भाषा ही माणासाची भावनिक आणि भौतिक गरज असते. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज असते. त्याचसोबत भौतिक गरजा म्हणजे पोटापाण्याची सोय लावण्यासाठी जो पैसा कमवावा लागतो, त्यासाठी भाषेची गरज असते. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर केल्यानंतर मराठी बोलणार्‍यांमध्ये आणि लिहिणार्‍यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. मराठीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. कारण त्या अगोदर मराठीला प्राकृत भाषा म्हणून कमी लेखले जात होते. त्यावेळी संस्कृतला श्रेष्ठत्व प्राप्त झालेले होते. कारण ती ज्ञानभाषा होती. एखादा विषय जोपर्यंत संस्कृतमध्ये लिहिला जात नाही, तोपर्यंत त्याला प्रमाण मानला जात नसे. त्याला समाजातील अभिजनांकडून मान्यता मिळत नसे. पण पुढे संस्कृृतमधील भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर झाल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. बहुसंख्य मराठी माणसांच्या मनात कोंडून राहिलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना आकलन होणार्‍या मराठी भाषेचे माध्यम मिळाले, त्यामुळे ते विविध प्रकारे मराठीतून लिहिते झाले. ज्ञानेश्वरांच्या पूर्वीही मराठी बोलली आणि लिहिली जात होती. पण ज्ञानेश्वरांनी मराठी विषयीचा लोकमनातील आत्मविश्वास जागवला. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या नंतर समाजातील विविध स्तरांतील संतांनी संतसाहित्याची निर्मिती केली. त्यामुळे मराठी भाषा ही महाराष्ट्रभर खर्‍या अर्थाने भराला आली. काही भाषा अभ्यासकांचे म्हणणे आहे की, मराठी ही संस्कृतोद्भव आहे. तर काहीचे मत आहे की, मराठी ही स्वतंत्र भाषा आहे. तिला आपला स्वत:चा इतिहास आहे.

- Advertisement -

ब्रिटिशांच्या राजवटीत प्रादेशिक भाषा शिकल्या जात होत्या, पण त्या काळी इंग्रजीचा जास्त जोर आणि भर होता. त्यात पुन्हा जगाच्या बहुतांश भागावर ब्रिटिशांचे साम्राज्य होते. त्यामुळे जिथे त्यांचे राज्य होते, तिथे इंग्रजीचा प्रभाव होता. भारतामध्ये इंग्रजांविरोधात लढण्यासाठी इंग्रजीचा उपयोग भारतीय लोकांना झाला. विशेषत: ब्र्रिटिशांच्या राजवटीतून भारत मुक्त झाल्यानंतरही भारतीय शिक्षणावर इंग्रजीचा पगडा होता. पण बहुसंख्य लोक शिक्षणाच्या कक्षेत यावेत, त्यांना विषयांचे आकलन व्हावे, म्हणून प्रादेशिक भाषांमधून शिक्षण देण्यावर भर देण्यात येऊ लागला. महाराष्ट्रात मराठीतून शिक्षण सुरू झाले. त्यातून मराठीत विविध साहित्य प्रकार उदयास आले. पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये वाढत्या जागतिकीकरणामुळे पुन्हा इंग्रजी माध्यमांचे आकर्षण आणि प्रभाव वाढू लागला. त्यामुळे आपल्या मुलांना थेट इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालण्याचे प्रमाण वाढले. तर दुसर्‍या बाजूला मराठी शाळा बंद पडण्याचे प्रमाण वाढू लागले. त्यातूनच मराठी भाषेचे पुढील काळात काय होणार असा प्रश्न मराठी लोकांनाच भेडसावू लागला आहे.

आपल्या मुलांना चांगले इंग्रजी यावे, त्यामुळे त्याला उच्च शिक्षण घेताना भाषेची काही अडचण भासणार नाही. त्यांना जगभरातील विविध संधी मिळवता येतील. असे प्रत्येक पालकाला वाटत असल्यामुळे कटकसर करून ते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवतात. आपली मुले इंग्रजी माध्यमात गेली की, ती अधिक स्मार्ट होतात, अशी पालकांची भावना आहे. पण सध्या मराठी माणसांची भाषिकबाबतीत द्विधा अवस्था झालेली आहे. तो एका बाजूला म्हणत आहे की, मराठी बोला आणि मराठी वाचवा, पण आपल्या मुलानातवंडांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालत आहे. काही मराठी लोकांना तर मराठी बोलण्यातही कमीपणा वाटतो, त्यांना आपण एलिट आहोत, असा तोरा त्यातून मिरवायचा असतो. मराठीची जमेची अशी बाजू आहे की, आजही महाराष्ट्रात मराठी बोलणार्‍यांची आणि समजणार्‍यांची संख्या मोठी आहे. कारण कितीही भावनिक उमाळा आला तरी लोक आपला व्यवहार नीट चालतो का हे पाहत असतात. त्यामुळे मराठी विषयी प्रेम व्यक्त केले तरी इंग्रजीमुळे आपला व्यवहार चांगला जमणार आहे, हे लक्षात घेण्यात येते.

- Advertisement -

मुलाला कुठलाही विषय हा त्याच्या मातृभाषेतून शिकवला तर त्याला त्याचे चांगल्या प्रकारे आकलन होत असते, हे जगातले भाषाअभ्यासक सांगत असतात, पण मराठी माणसाला एका बाजूला मराठी वाचावी, असे वाटत आहे, तर दुसर्‍या बाजूला त्यांना अधिकाधिक स्वत:चे इंग्रजीकरण करून घ्यायचे आहे. मराठी माणसांच्या पुढील पिढ्या आता थेट इंग्रजी माध्यमांमध्ये शिकत आहेत. त्यांना मराठी भाषा आणि त्यातील लेखक, कवी कोण आहेत, याची फारशी कल्पनाही नाही. आता हा रिमिक्सचा जमना आलेला आहे. मराठी आणि इंग्रजी, हिंदी यांचे मिश्रण करून बरेचदा बोलले जाते. त्यातून अभिजातपणा काढता पाय घेत आहे. एका बाजूला मराठी माणसे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नाहीत, म्हणून केंद्र सरकारच्या नावाने टाहो फोडत आहेत, तर दुसर्‍या बाजूला मराठी भाषेवरची त्यांची पकड इंग्रजी माध्यमामुळे कमी होत आहे. इंग्रजीला विरोध असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी मराठी या आपल्या मातृभाषेचा बळी देऊन कसे चालेल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -