घरक्रीडाISSF World Championships : अंकुर मित्तलची ऐतिहासिक कामगिरी

ISSF World Championships : अंकुर मित्तलची ऐतिहासिक कामगिरी

Subscribe

भारताचा नेमबाज अंकुर मित्तलने आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला आणखी एक पदक मिळवून दिले आहे. भारताच्या नेमबाजांनी या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे.

साउथ कोरियाच्या चँगवून शहरात सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय नेमबाज अंकुर मित्तलने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या डबल ट्रॅप नेमबाजी प्रकारात त्याने सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. मात्र, डबल ट्रॅप हा नेमबाजीचा प्रकार ऑलिम्पिकमध्ये होत नसल्याने तो स्पर्धा जिंकूनही ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही.

अंतिम फेरीत अप्रतिम प्रदर्शन 

डबल ट्रॅप या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अंकुर मित्तलने अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने शूटऑफमध्ये चीनच्या यियांग यांगचा पराभव केला. ७५ फेऱ्यानंतर अंकुर, चीनचा यियांग आणि स्लोव्हाकियाच्या हुबर्ट आंद्रेज ओलेंनिक या तिघांच्याही खात्यात १४० गुण जमा होते. त्यामुळे ही स्पर्धा शूट-ऑफमध्ये गेली. शूटऑफमध्ये अंकुरने चार लक्ष्य अचूक साधत सुवर्ण पदक जिंकले. तर यियांगने तीन वेळा अचूक लक्ष्य साधत रौप्य पदक मिळवले. ओलेंनिकला एकच लक्ष्य साधता आल्याने त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

सांघिक स्पर्धेतही चमक 

डबल ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत भारताच्या अंकुर मित्तल, शार्दूल विहान आणि असाब मोहम्मद या तिघांच्या संघाने कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत भारताला ४०९ गुणांसह कांस्य पदक मिळाले. तर इटलीने ४११ गुणांसह सुवर्ण आणि चीनने ४१० गुणांसह रौप्य पदक मिळवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -