घरक्रीडाIND vs ENG : विराट कोहलीची केन विल्यमसनच्या 'या' विक्रमाशी बरोबरी 

IND vs ENG : विराट कोहलीची केन विल्यमसनच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी 

Subscribe

कोहलीचे भारताचा कर्णधार म्हणून टी-२० क्रिकेटमध्ये ११ वे अर्धशतक होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना मंगळवारी पार पडला. या सामन्यात जॉस बटलरने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने ८ विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचे इतर फलंदाज अपयशी ठरत असताना कर्णधार विराट कोहलीने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने या सामन्यात ४६ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७७ धावांची खेळी केली. हे त्याचे या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक ठरले. तसेच हे कोहलीचे भारताचा कर्णधार म्हणून टी-२० क्रिकेटमध्ये ११ वे अर्धशतक होते. त्यामुळे त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या विक्रमाशी बरोबरी केली.

सर्वाधिक ११-११ अर्धशतके

कोहली आणि विल्यमसन यांची सध्याच्या घडीच्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. कोहली आणि विल्यमसन यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक ११-११ अर्धशतके केली आहे. याआधीच्या सामन्यात कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार केला होता. ही कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील पहिलाच फलंदाज ठरला होता.

- Advertisement -

अ‍ॅरॉन फिंच दुसऱ्या स्थानावर

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीने आतापर्यंत ८८ सामने खेळले असून त्यात ३०७८ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून त्याने ४१ सामन्यांत १४२१ धावा केल्या असून यात ११ अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहली आणि विल्यमसन (११) अव्वल स्थानी असून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंच (९) दुसऱ्या स्थानावर आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -