घरमुंबईपावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी पूर्वतयारीचे आदेश

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी पूर्वतयारीचे आदेश

Subscribe

आयुक्तांनी मुंबईतील सर्व प्राधिरणांच्या प्रमुख, प्रतिनिधी यांची एक महत्वपूर्ण ऑनलाईन बैठक घेतली.

पावसाळ्यात शहर आणि उपनगरात पाणी साचून मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी सर्व प्राधिरणांनी एकमेकांशी समन्वय साधून आवश्यक ती उपाययोजना व पूर्वतयारी करावी, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या प्रमुखांना दिले आहेत. तसेच पावसाळ्यात घडणाऱ्या इमारत दुर्घटना व त्यात होणारी जीवित व वित्तीय हानी टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्या रिकाम्या करण्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेशही आयुक्तांनी संबंधित प्राधिकरणांना दिले आहेत. पावसाळा पूर्वतयारीच्या दरम्यान कोविड विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

मुंबईत एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी पालिका व सर्व यंत्रणा झटत असतानाच दुसरीकडे पावसाळा दीड महिन्यांवर येऊन ठेपल्याने पालिका आयुक्तांनी मुंबईतील सर्व प्राधिरणांच्या प्रमुख, प्रतिनिधी यांची एक महत्वपूर्ण ऑनलाईन बैठक घेतली. तसेच, सर्व प्राधिकरणांनी पावसाळा पूर्व तयारी करावी व त्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, यंत्रणा तैनात ठेवावी आणि समन्वयाने काम करावे, असे आदेश दिले.

- Advertisement -

या बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी विविध यंत्रणांकडून त्यांच्या स्तरावर करण्यात येत असलेल्या व करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय साधण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सूक्ष्मस्तरीय नियोजन करावे आणि पावसाळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने कार्यवाही करताना कोविड विषयक सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आदेशही आयुक्तांनी यावेळी उपस्थित सर्व प्राधिकरणांना दिले.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी हेसुद्धा उपस्थित होते. तसेच मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रमुख, प्रतिनिधी, अधिकारी महापालिकेचे संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त व विविध खात्यांचे प्रमुख आदी उपस्थित होते.

- Advertisement -

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात काही सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर, जनजीवनावर त्याचा विपरीत होणारा परिणाम लक्षात घेता, यंदा पावसाळ्यात कुठेही पाणी साचून मुंबईची तुंबई होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि त्यासाठी प्रत्येक प्राधिकरणाने सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेशही पालिका आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच, मुंबईत अनेक ठिकाणी सध्या मुंबई मेट्रो रेल्वेची कामे प्रगतीपथावर आहेत. या अनुषंगाने या बांधकामातून निघणारा राडारोडा वेळच्यावेळी हलवावा आणि या कामांमुळे पावसाळ्यादरम्यान कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी मुंबई मेट्रो प्रशासनाने घ्यावी, असेही ते म्हणाले.

नालेसफाईची पाहणी होणार

मुंबई महापालिका क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे व्हावा, यादृष्टीने महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी नालेसफाईची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. यासोबतच रेल्वे हद्दीतही रेल्वे प्रशासनाद्वारे व महापालिकेच्या आर्थिक सहकार्यातून नालेसफाईची कामे करण्यात येत आहेत. या विविध स्तरीय नालेसफाई कामांचा आढावा आजच्या बैठकीदरम्यान घेण्यात आला. या अनुषंगाने लवकरच पाहणी दौऱ्यांचे आयोजन करण्यात येत असल्याचीही माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -