घरमुंबईCorona Vaccination : १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसीसाठी पैसे मोजावे लागणार?

Corona Vaccination : १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसीसाठी पैसे मोजावे लागणार?

Subscribe

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतील खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांवरच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला.

भारतात येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस मोफत की विकत द्यायची, याबाबत उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतील खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांवरच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचा निर्णय आज जाहीर केला. १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांना शासन व पालिका लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येणार नाही, असे आयुक्तांनी ठामपणे म्हटले आहे.

खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी पैसे घेण्यात येतात. त्यामुळे आयुक्तांच्या निर्णयाचा सरळ अर्थ असा होतो की, १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रातच लस घ्यावी लागणार असून त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, उद्याच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

- Advertisement -

मुंबईत १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी करणे व एकूण लसीकरण आणि कोरोनाग्रस्तांना विविध सेवा देण्याबाबत पालिका आयुक्तांनी मंगळवारी संबंधित पालिका अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांची ऑनलाईन बैठक घेऊन त्याद्वारे आढावा घेतला.

मुंबईत सध्या कार्यान्वित असलेल्या महापालिका आणि शासकीय अशा एकूण ६३ केंद्रांवर सद्यस्थितीप्रमाणे ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण करण्यात येईल. नोंदणीकृत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. मुंबईतील सर्व ७३ खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच नोंदणीकृत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महापालिका आयुक्तांनी यांनी जाहीर केला आहे.

- Advertisement -

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्यासाठी राज्य सरकारला अंदाजे साडे तीन हजार ते साडे पाच हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे हे लसीकरण मोफत करण्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांत मतभेद आहेत. उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोफत लस देण्याबाबतचा निर्णय होणार आहे. मात्र, पालिका आयुक्त चहल यांनी वरीलप्रमाणे निर्णय जाहीर केल्याने काहीसा गदारोळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईत २२७ लसीकरण केंद्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत. त्याप्रमाणे १ मे पासून लसीकरण सुरू होणार आहे. मात्र, मुंबई, महाराष्ट्रासह देशात लसीचा तुटवडा जाणवत असताना मुंबई महापालिकेने शहर व उपनगरातील २२७ वार्डात प्रत्येकी एक याप्रमाणे लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

मुंबईतील गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस, विविध कंपन्या यांनी खासगी रुग्णालयांसोबत ‘टायअप’ करुन आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यानंतर पात्र सदस्यांचे प्रत्यक्ष लसीकरण करुन घ्यावे, असे पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -