घरमुंबईमुंबईकरांना त्वरीत मोफत लस द्या; BJP नगरसेवकांचं महापौर दालनाबाहेर आंदोलन

मुंबईकरांना त्वरीत मोफत लस द्या; BJP नगरसेवकांचं महापौर दालनाबाहेर आंदोलन

Subscribe

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णसंख्या रोखण्यासाठी व्यापक लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईतील नागरिकांना मोफत आणि त्वरित लस द्या, अशी मागणी करत भाजप नगरसेवकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनाबाहेर आंदोलन केलं. कोविड लस द्या..! लस द्या.. सर्वांना मोफत लस द्या, सर्वांना त्वरित लस द्या…मुंबईकरांचे प्राण वाचवा..! अशा घोषणा देत भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनाबाहेर जोरदार निदर्शने केली.

गेले तीन दिवस पालिकेने लसीकरण केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला अथवा दुसरा डोस मिळणार नाही असे घोषित केले आहे. याआधीही आठवडाभर लसींची कमतरता असल्यामुळे सर्व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण पूर्णत: थांबवले होते. त्यामुळे गेले १० दिवस शासकीय केंद्रांवर लसीकरणासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. यामध्ये वरीष्ठ नागरिकांना विशेषत: ८० वर्षांवरील अती वरिष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रावरील उसळलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून लसीकरणाच्या प्राथमिक उद्दिष्टास हरताळ फासला जात आहे. तरी ही वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून तातडीने सर्वांना मोफत लसीकरण करून मुंबईकरांचे प्राण वाचवण्याची मागणी गटनेते श्री. प्रभाकर शिंदे यांनी केली आहे

- Advertisement -

काय आहेत मागण्या?

१) सर्व मुंबईकरांचे मोफत लसीकरण करावे.
२) ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांची स्वतंत्र रांग लसीकरण केंद्रांवर लावण्याच्या सूचना द्याव्यात.
३) अती वरिष्ठ नागरिक म्हणजेच ८० वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी स्वतंत्र रांगेची सोय करावी.
४) ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस घ्यायचा असेल तर नोंदणीनंतर वॉक इन लसीकरण न करता कालबद्ध पूर्व नियोजित वेळेनुसारच लसीकरण करण्यात यावे. (Pre booked appointment)
५) १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना नोंदणी नंतर आगावु निश्चित केलेल्या वेळेनुसारच (Pre booked appointment) लसीकरण करण्यात यावे.
६) मुंबईकरांचे लसीकरण लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी पुरेसा लसीचा पुरवठा प्रत्येक लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करावा.
७) सर्व लसीकरण केंद्रे किमान १२ तास आणि आवश्यक असेल, शक्य असेल तिथे २४ तास लसीकरणासाठी उघडी ठेवावीत. सर्व लसीकरणाची प्रक्रिया आगावु निश्चित केलेल्या वेळेनुसारच (As per strictly pre booked appointment) करावी.

या निदर्शनावेळी गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, प्रभारी भालचंद्र शिरसाट, उपनेते अभिजित सामंत, रिटा मकवाना, उज्वला मोडक, अतुल शाह, शितल गंभीर-देसाई, राजेश्री शिरवडकर, ज्योती अळवणी, प्रकाश गंगाधरे, महादेव शिवगण व अन्य भाजप नगरसेवक उपस्थित होते.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -