घरमुंबईपश्चिम उपनगरातील नालेसफाईचे काम ७६ टक्के काम पूर्ण; महापौर किशोरी पेडणेकर यांची...

पश्चिम उपनगरातील नालेसफाईचे काम ७६ टक्के काम पूर्ण; महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती 

Subscribe

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईकर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

पश्चिम उपनगरातील नालेसफाईचे जवळपास ७६ टक्के काम पूर्ण होत आले असून उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी अधिक गतीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. महापौर किशोर पेडणेकर, उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंगळवारी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. महापौर व इतर पदाधिकाऱ्यांनी एच/पूर्व विभागातील वाकोला नदी, एच /पश्चिम विभागातील एसएनडीटी नाला, के/पश्चिम विभागातील ओशिवरा लींक रोडवरील ओशिवरा नदी, पी /दक्षिण विभागातील गोरेगाव पश्चिम लिंक रोडवरील शास्त्री नगर नाला, आर/दक्षिण विभागातील लिंक रोडवरील पोईसर नदी, आर/मध्य विभागातील बोरिवली पश्चिमचा राजेंद्र नगर नाला, आर/ उत्तर विभागातील दहिसर (पश्चिम) मधील दहिसर नदीची पाहणी केली. त्यानंतर महापौरांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

२२ फेब्रुवारीपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. कोरोनाच्या काळातही नालेसफाईच्या कामांमध्ये खंड पडला नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईकर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. पूर्वी पावसाळ्यामध्ये दोन ते तीन दिवस पाण्याचा निचरा होत नव्हता, सद्यस्थितीत उदंचन केंद्राच्या कामामुळे पाण्याचा निचरा हा दोन ते तीन तासात होत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

त्यासोबतच दहिसर येथील दहिसर नदीवर पुलाच्या कामासाठी बांधण्यात आलेली बँड वॉल काढून टाकण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. तसे केल्यास दहिसर गावठाणचा परिसर जलमय होणार नाही. त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच कोरोना काळातही मुंबई महानगरपालिकेची नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. नालेसफाईच्या संपूर्ण कामावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष असून त्यादृष्टीने ते वेळोवेळी नालेसफाई कामांचा आढावा घेत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -