घरफिचर्सकामणदुर्ग गड

कामणदुर्ग गड

Subscribe

ठाणे जिल्ह्यात उंचीच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या कामणदुर्गाने आपल्या अंगाखांद्यावर प्रचिनत्वाच्या खुणा बाळगल्या आहेत. दोन तीन तासांचा खडा चढ, घनदाट जंगल आणि कड्यात खोदलेल्या पायर्‍या या गिर्यारोहकांना आकर्षित करणार्‍या गोष्टी असूनदेखील या किल्ल्यावर फार कमी भटके येतात. सन १६८३ साली संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतलेल्या या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने उल्हास नदीतून चालणार्‍या व्यापारी वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी केला जाई.

कसलेल्या साहसवीरांना आव्हान देणारा तो कामणदुर्ग. नावाप्रमाणे त्याची प्रचिती आम्ही एकदा अनुभवली असल्याने यावेळी कसून प्रयत्न करायचे असं मनोमन ठरवलं आणि आमची चौकडी कामणदुर्गाच्या मोहीमेवर निघाली. ५ डिसेंबर २०१५ ची रात्र. दोन दुचाकींची व्यवस्था आम्ही आधीच केली होती. अजय पडवळ सुट्टी निमित्ताने मस्कत वरुन मुंबईत आल्याने आम्हाला एक नवा साथीदार मिळाला होता. रात्री दादरहून विरार करीता शेवटची लोकल पकडली आणि आमचा प्रवास सुरू झाला. शेवटची लोकल असल्याने थोडीफार गर्दी होती म्हणा. मात्र गप्पा गोष्टी करीत वसई स्थानक केव्हा आलं याचं भानदेखील राहिलं नाही.

मध्यरात्री ०२:३० च्या सुमारास आम्ही वसई स्थानकात दाखल झालो. रेल्वे स्थानकातील तुरळक गर्दी क्षणार्धात ओसरली. आम्ही तिघेणज मात्र रेल्वे स्थानक परिसरात घुटमळत होतो. कडाक्याची थंडी होती. घरातून निघताना इच्छा नसतानादेखील स्वेटर आणि हातमोजे बॅगमधे भरले होते आणि आता त्याबद्दल माझं मलाच कौतुक वाटत होतं. प्रसंग तसा दुर्मीळच म्हणा. पुढील पाच एक मिनिटात ठरल्याप्रमाणे दोन बाइक घेऊन वीरेन पडवळ आणि निलेश सावंत वसई स्टेशनात दाखल झाले आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आमच्या मोहिमेचा श्रीगणेशा झाला.

- Advertisement -

सातीवली परिसरात हायवेजवळ आम्ही गाड्या थांबवल्या. हायवेजवळ असणार्‍या एका हातगाडी जवळ तुरळक गर्दी होती. कडाडून भूक लागली होती. पोटपूजा करणे आवश्यकच होते. गरम करून दिलेला समोसा पाव आणि त्यानंतर वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत आम्ही पुढील योजना आखल्या. बाईकने ट्रेकला जाण्याची आमची ही पाहिली खेप असल्याने मला स्वत:ला कमालीची उत्सुकता होती. आजवरच्या गिर्यारोहणाच्या प्रवासात मला बरेच हाडाचे गिर्यारोहक सोबती म्हणून लाभले. विरेंद्र पडवळ, विशाल नेर्लीकर आणि अजय पडवळ हे त्यापैकी आजच्या प्रवासात सोबतीला होते.
सातीवलीहून कामणगावाकडे आमचा प्रवास सुरू झाला. सुमारे अर्ध्या एक तासात आम्ही कामणदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बेलकुंडी या पाड्यात दाखल झालो. पहाटेचा साधारण साडे चारचा सुमार होता. बेलकुंडी पाडा साखरझोपेत होता. दिवसभर श्रमाची कामे करून थकलेले देह अंगणातील बाकावर विश्रांती घेत होते.

दगदगीच्या शहरी जीवनाशी पाड्याचा फारसा संपर्क नसावा. त्यामुळेच कदाचित त्यांना ‘सुखाची झोप’ लागली असावी. मालकाशी इमान राखणार्‍या दोन चार जणांनी आमची चाहूल लागताच आमच्या दिशेकडे पाहून भुंकण्यास सुरुवात केली. तसे आम्हीसुद्धा तिथे न घुटमळता गाड्या कामणदुर्गच्या जंगलाच्या दिशेने वळवल्या. पायवाट होती ती. वाटेत येणारा प्रत्येक दगड चुकवत आम्ही बेलकुंडी पाड्यापासून सुमारे एक दीड किलोमीटर आत जंगलात आलो होतो. आता यापुढे गाडी नेणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही एका मोकळ्या जागेवर गाड्या उभ्या केल्या आणि काही क्षण आम्ही एकमेकांच्या अंधारातील आकृतीकडे पाहत बसलो. समोर काही दिसण्यास मार्ग नव्हता. पुढील प्रवास हेड टॉर्चच्या सहाय्याने करू असं ठरवून निघालेले आम्ही अंधारात नेमकी वाट कोणती हे शोधत होतो. त्यातच भरीस भर म्हणून रात किड्यांचा किर्र आवाज होताच. मध्येच एखादं वटवाघूळ सर्रकन कानाजवळून निघून जाई. किर्र काळोख मी म्हणत होता. आसपास भयाण शांतता होती. अशा परिस्थितीत शेकोटी पेटवणं आवश्यकच होतं. पाठीवरील बॅग बाजूला ठेवून झाडांची सुकी पाने आणि वाळलेली लाकडे शोधू लागलो. ओल्या सुक्या लाकडांच्या आधारावर कशीबशी शेकोटी पेटवली. सोबत आणलेली मक्याची कणसे त्या शेकोटीत होरपळून खात असताना पहाटेची चाहूल लागली.

- Advertisement -

तांबड फुटू लागलं तशी आम्ही पुढे निघण्याची तयारी सुरू केली. जंगल घनदाट असल्याने सूर्यकिरणांना प्रवेश मिळणे अवघडच होतं. दाट धुक्यातून रस्ता शोधणे म्हणजे एक कठीण काम. वाटेत बर्‍याच ठिकाणी कोळ्यांनी जाळी विणली होती त्याचा एक अतिरिक्त थर चेहर्‍यावर बसला होता. सर्प दर्शनाची हौसदेखील या जंगलात पूर्ण झाली. कामणदुर्ग किल्ल्याकडे जाणारी मूळ वाट काही केल्या सापडेना. कारवीच्या घनदाट जंगलामुळे अगदी १०० फुटांवरचेसुद्धा नीट ऐकू येत नाही. म्हणून आम्ही ठराविक अंतराने चालत होतो. किंचित मळलेल्या वाटा आणि दुर्गम प्रदेश पाहून इकडे फिरकण्याची कुणी तसदी घेत नसावे याची मनोमन खात्री झाली. वाटेत एखाद्या ऊंच दगडावर उभे राहून आम्ही किल्ल्याचा माथा कुठे दिसतोय का हे पाहत होतो. एव्हाना सुमारे दोन एक तासांची पायपीट झाली होती. एका मध्यवर्ती ठिकाणी आल्यावर दुरुन किल्ल्याचे टोक दिसले आणि दमलेल्या पावलांना स्फुरण चढले. गवतातून आणि कारवीच्या जंगलातून वाट तयार करत आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. आजवरच्या माझ्या मोहिमेतील हा एकमेव किल्ला असा होता ज्याने मला दोनदा चकवा देण्याचा प्रयत्न केला.

ठाणे जिल्ह्यात उंचीच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या कामणदुर्गाने आपल्या अंगाखांद्यावर प्रचिनत्वाच्या खुणा बाळगल्या आहेत. दोन तीन तासांचा खडा चढ, घनदाट जंगल आणि कड्यात खोदलेल्या पायर्‍या या गिर्यारोहकांना आकर्षित करणार्‍या गोष्टी असूनदेखील या किल्ल्यावर फार कमी भटके येतात. सन १६८३ साली संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतलेल्या या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने उल्हास नदीतून चालणार्‍या व्यापारी वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी केला जाई. वसई लढाईत या किल्ल्याने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. किल्ल्यावर कातळात खोदलेली ५ टाके आहेत. टाक्यांच्या बाजूने जाणारी एक वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावार जाते. येथून तुंगरेश्वर आणि गोतारा हे किल्ले तसेच पश्चिमेला वसई खाडी ते धारावीपर्यंतचा प्रदेश नजरेत येतो. किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर झुडुपाच्या सावलीत थकलेले देह क्षणभर विश्रांती घेत होते आणि मोकळ्या आसमंताकडे पाहत मन मात्र इतिहासाच्या पाऊलखुणा धुंडाळण्यात गुंतले होते. दोनदा गुंगारा देणारा कामणदुर्ग पाहिल्याचं एक वेगळं समाधान सर्वांच्या चेहेर्‍यावर दिसत होतं.


-संदेश कुडतरकर (पाऊलखुणा ट्रेकर्स)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -