घरक्रीडादेशासाठी खेळताना अहंकार बाजूला ठेवावा लागतो; पोवारसोबतचा वाद संपवण्यास मिताली तयार 

देशासाठी खेळताना अहंकार बाजूला ठेवावा लागतो; पोवारसोबतचा वाद संपवण्यास मिताली तयार 

Subscribe

पोवारचे प्रशिक्षकपदी पुनरागमन झाले असून त्याच्यासोबत काम करण्यासाठी मिताली तयार आहे.

भारताच्या महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवारमध्ये काही वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर पोवारची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी झाली होती. परंतु, आता पोवारचे प्रशिक्षकपदी पुनरागमन झाले असून त्याच्यासोबत काम करण्यासाठी मिताली तयार आहे. मी २१ वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. देशाकडून खेळताना तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवायचा असतो. मी माझ्या पसंती किंवा नापसंतीला फार महत्व देत नाही. २१ वर्षे हा खूप मोठा काळ आहे. इतक्या मोठ्या काळात तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. परंतु, जेव्हा देशासाठी खेळण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही वैयक्तिक गोष्टींना महत्व देऊन चालत नाही. तुम्ही पुढचा विचार करणे गरजेचे असते, असे मिताली म्हणाली.

एकत्रित काम करणे गरजेचे

मितालीसह भारतीय महिला संघ सध्या मुंबईत क्वारंटाईन आहे. हा संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी मालिकाही खेळणार आहे. भारताचा हा सात वर्षांत पहिला कसोटी सामना असणार आहे. तसेच पुढील वर्षी महिला एकदिवसीय वर्ल्डकप होणार असून या स्पर्धेच्या दृष्टीने इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेलाही विशेष महत्व आहे. मात्र, भारतीय महिला संघाला यशस्वी व्हायचे असल्यास कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

मतभेद बाजूला ठेवणे महत्वाचे

प्रशिक्षक म्हणून पोवारने काही योजना आखल्या आहेत. भारतीय संघाला यशस्वी व्हायचे असल्यास आम्ही एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. माझे आणि त्याचे लक्ष्य एकच आहे. भारतीय महिला संघाने एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करावी असे आम्हाला वाटत आहेत. परंतु, हे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवणे महत्वाचे आहे, असे मितालीने सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -