घरक्रीडाYashpal Sharma : १९८३ विश्वविजयाचा ‘अनमोल हिरा’!

Yashpal Sharma : १९८३ विश्वविजयाचा ‘अनमोल हिरा’!

Subscribe

कपिल देवच्या नेतृत्वात भारताने १९८३ साली पहिल्यांदा एकदिवसीय वर्ल्डकपवर आपले नाव कोरले होते. कोणालाही अपेक्षा नसताना केलेल्या या विश्वविजयी कामगिरीमुळे भारतातील क्रिकेटचे रुपडे पालटले. भारताच्या या वर्ल्डकप विजयात प्रमुख योगदान देणाऱ्या खेळाडूंबाबत चर्चा करताना कर्णधार कपिल, तसेच मोहिंदर अमरनाथ आणि रॉजर बिन्नी यांचे प्रामुख्याने नाव घेतले जाते. परंतु, मधल्या फळीतील फलंदाज यशपाल शर्मा यांच्या योगदानाशिवाय भारताला १९८३ वर्ल्डकप जिंकणे शक्य झाले नसते. यशपाल यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते आता आपल्यात नसले, तरी त्यांचे भारतीय क्रिकेटला असलेले योगदान कोणीही विसरू शकणार नाही.

इंग्लंडमध्ये झालेला १९८३ वर्ल्डकप हा भारतीय क्रिकेटला कलाटणी देणारा ठरला. या वर्ल्डकपमध्ये कर्णधार कपिलने झिम्बाब्वेविरुद्ध केलेली १७५ धावांची खेळी जितकी महत्त्वाची होती, तितकीच महत्त्वाची होती यशपाल शर्मा यांनी केलेली दोन अर्धशतके. यशपाल यांचा धडाकेबाज फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असा लौकिक होता. स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाब, हरयाणा आणि रेल्वे या संघांकडून खेळलेल्या यशपाल यांना १९७८ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतरची पुढील काही वर्षे यशपाल आणि भारतीय संघासाठी अविस्मरणीय ठरली.

कसोटी कारकिर्दीतील सातव्या सामन्यात त्यांना पहिले शतक झळकावण्यात यश आले. दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानावर झालेल्या या कसोटीत यशपाल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३९ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. कोटलाशी यशपाल यांचे खास नाते होते. याच मैदानावरील आपल्या पुढील सामन्यात यशपाल यांच्या खेळीमुळे भारताचा पराभव टळला होता. पाकविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. वेगवान गोलंदाज सिकंदर बख्तच्या ८ विकेटमुळे पाकच्या २७३ धावांचे उत्तर देताना भारताचा पहिला डाव केवळ १२६ धावांत आटोपला होता. पाकने दुसऱ्या डावात २४२ धावांची मजल मारत भारतापुढे ३९० धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना दिलीप वेंगसरकर (नाबाद १४६) आणि यशपाल (६०) यांनी रचलेल्या १२२ धावांच्या भागीदारीमुळे भारताला हा सामना अनिर्णित राखण्यात यश आले.

- Advertisement -

यशपाल यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला तो म्हणजे १९८३ वर्ल्डकप. सलामीच्याच लढतीत भारतापुढे दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचे आव्हान होते. मँचेस्टर येथे झालेल्या या सामन्यात माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स आणि जोएल गार्नर या तेज चौकडीपुढे भारताची ३ बाद ७६ अशी अवस्था झाली होती. मात्र, यशपाल यांनी एक बाजू लावून धरली. त्यांनी मुंबईकर संदीप पाटीलच्या (३६) साथीने ४९ धावांची भागीदारी रचत भारताला सावरले.

त्यानंतर रॉजर बिन्नी (२७) आणि मदन लाल (नाबाद २१) यांच्या साथीने महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचत त्यांनी भारताच्या डावाला आकार दिला. यशपाल यांनी चिकाटीने फलंदाजी करत १२० चेंडूत ८९ धावांची खेळी केल्याने भारताला ६० षटकांत ८ बाद २६२ अशी धावसंख्या उभारण्यात यश आले होते. याचा पाठलाग करताना बिन्नी आणि शास्त्री यांच्या ३-३ विकेटमुळे विंडीजला २२८ धावांत रोखत भारताने ३४ धावांनी हा सामना जिंकला.

- Advertisement -

तसेच उपांत्य फेरीत यजमान इंग्लंड अगदी सहज भारताचा पराभव करेल असे त्यावेळी म्हटले जात होते. कपिलच्या सेनेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला २१३ धावांत रोखले. परंतु, याचा पाठलाग करताना भारताची २ बाद ५० अशी अवस्था झाली होती. मात्र, यशपाल यांनी मोहिंदर अमरनाथ (४६) आणि संदीप पाटील (५१) यांच्या साथीने उत्कृष्ट फलंदाजी करत भारताला अनपेक्षित विजय मिळवून दिला. यशपाल यांनी ११५ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. पुढील सामन्यात मग भारताने विंडीजला पुन्हा एकदा पराभूत करत १९८३ वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. भारताचा हा विश्वविजय यशपाल यांच्या ८ सामन्यांतील २४० धावांशिवाय शक्य नव्हता. अशा या भारताच्या पहिल्यावहिल्या विश्वविजयाच्या अनमोल हिऱ्याला आदरांजली!

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -