घरमहाराष्ट्रआज लागणार दहावीचा निकाल

आज लागणार दहावीचा निकाल

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करत मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल 16 जुलैला दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे 12 मे रोजी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर २८ मे रोजी दहावीचा निकाल मूल्यमापन पद्धतीने लावण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे नुकतेच शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत 2021 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 मुलींचा समावेश आहे.

- Advertisement -

नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी 16 जुलैला दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या http://result.mh-ssc.ac.in तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता नववीचा अंतिम निकाल, इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इयत्ता दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे मंडळाने परीक्षेचे निकाल तयार केले आहेत.

संकेतस्थळावर बैठक क्रमांक उपलब्ध
परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यात आले नाही. त्यामुळे सर्व शाळांना विद्यार्थ्यांचे नाव व बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही बैठक क्रमांक मिळालेला नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले बैठक क्रमांक संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावेत, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -