घरमुंबईचेंबुर, विक्रोळी, भांडूपमध्ये दरड कोसळून तब्बल १८ जणांचा मृत्यू, महापौरांची पहिली प्रतिक्रिया

चेंबुर, विक्रोळी, भांडूपमध्ये दरड कोसळून तब्बल १८ जणांचा मृत्यू, महापौरांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये घरांवर संरक्षण भिंत कोसळून तब्बल १८ जणांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तिनही ठिकाणी एनडीआरएफची टीम आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. या घटनेवर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत दरड कोसळून झालेली घटना अत्यंत दुख:द- महापौर

“मुंबईत दरड कोसळून झालेली घटना ही अत्यंत दुख:द आहे. मुंबई रेकॉर्डब्रेक पाऊस होता. वसई, विरार, पालघर सगळीकडेच जलमय झाले आहे. पावसाची इशारा देत असतो. त्यावेळी अशा धोकादायक ठिकाणी घरे असणाऱ्या नागरिकांनाही घरे खाली करण्याच्या सूचना देतो. पण लोक घरं सोडणं पसंत करत नाहीत. या दुर्घटनेचा रात्रभर आढावा घेत बचाव पथक घटनास्थळी पाठवले असून नागरिकांचा बचाव केला जात आहे. पोलीस, एनडीआरएफ, पालिका, डॉक स्कॉर्ड यांसारख्या यंत्रणा आपआपल्या परीने काम करत आहेत. मात्र ही दुख;दायक आणि क्लेशदायक घटना आहे. हिंदमाता परिसरात पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत टाक्यांच कामासंदर्भात काम सुरु आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहे.” असे प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

शनिवारी रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चेंबूरच्या भरत नगर भागातील बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचवेळी १४ जणांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (NDRF) दिली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. यामुळे जवळपास पाच घरे  बाधित झाली आहेत. आज पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. आत्तापर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १६ जणांना एडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या ढिगाऱ्यात अद्यापही काही लोक अडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एनडीआरएफ जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.

- Advertisement -

दुसरीकडे विक्रोळी सूर्यनगर परिसरात घरांवर दरड कोसळून ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ढिगाऱ्यात अडललेल्या ५ ते ६ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. शनिवारी मध्यरात्री दोन वाजून ४० मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. विक्रोळीतील पंचशील नगर झोपडपट्टीमध्ये ही घटना घडली आहे.

तर भांडुपमध्ये वनविभागाची संरक्षक भिंत कोसळून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. अमरकोट शाळेजवळची ही घटना आहे.

गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा हजेरी लावली. मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. सतत कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले आहेत. तर आत्तापर्यंत मुंबईतील विविध ठिकाणी दर कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, धारावी, अंधेरी, कांदिवली, बोरिवली, मिरारोड यांसह ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या सखल भागात पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे.  तसेच मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे.

 


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -