घरक्रीडाPravin Jadhav : साताऱ्याच्या एकलव्याची प्रेरणादायी गगनभरारी!

Pravin Jadhav : साताऱ्याच्या एकलव्याची प्रेरणादायी गगनभरारी!

Subscribe

सातारा जिल्ह्यातील फलटण जवळील सरडे गावचा प्रविण जाधव टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रविणचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहेच, तितकेच प्रेरणादायी आहे विकास भुजबळ सरांनी आपल्या शिक्षकी पेशाला दाखवलेले समर्पण. घरची परिस्थिती बिकट असतानाही चांगला आणि यशस्वी खेळाडू होण्यासाठी आवश्यक गुण प्रविणमध्ये असल्याचे भुजबळ सरांनी हेरले. त्याला केवळ अभ्यासक्रमात गुंतवून न ठेवता, खेळांमध्ये लक्ष केंद्रित करायला लावल्यास त्याचे जीवन बदलेल, असा भुजबळ सरांना विश्वास होता. याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी प्रविणला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. तो अधिक तंदुरुस्त झाल्यावर भुजबळ सरांनी राज्य सरकारने सुरु केलेल्या क्रीडा प्रबोधिनी योजनेमध्ये प्रविणचे नाव पुढे केले. याच ठिकाणी प्रविणच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करत यंदाच्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे मागील वर्षी होणारे टोकियो ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले होते. यंदा या जगातील सर्वात मोठ्या क्रीडास्पर्धेला २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. यंदाचे ऑलिम्पिक भारतासाठी खास ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. विशेषतः भारताचे तिरंदाज या ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. या तिरंदाजांमध्ये महाराष्ट्राच्या प्रविण जाधवचाही समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण जवळील सरडे गावचा प्रविण जाधव टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आणि मग त्याचा इथवरचा खडतर प्रवास संपूर्ण जगाला कळला. प्रविणच्या यशात विकास भुजबळ या शिक्षकाचा खूप मोठा वाटा आहे. प्रविणचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहेच, तितकेच प्रेरणादायी आहे विकास भुजबळ सरांनी आपल्या शिक्षकी पेशाला दाखवलेले समर्पण. भुजबळ सर हे प्रविणच्या प्रेरणेचा स्त्रोत आहेत असे म्हणणे वावगे ठरू नये.

- Advertisement -

२००६ साली विकास भुजबळ हे सातार्‍याच्या सरडे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत रुजू झाले. शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे त्यांनी प्रोफाइल तयार केले. विद्यार्थ्याची पार्श्वभूमी, त्यांच्यातले उपजत गुण व त्यांची अभ्यासातील प्रगती याचा त्यांनी डेटा तयार केला. दहा वर्षाचा प्रविण जाधव त्यावेळी अगदी सडपातळ बांध्याचा होता. जेमतेम २२ किलो त्याचे वजन! अभ्यासात तो हुशार, पण घरची परिस्थिती बिकट होती. जेवण-खाण नीट होत नव्हते. वडील शेतमजुरी करायचे आणि मोठ्या जिकरीने संसाराचा गाडा ओढायचे.

घरची बिकट परिस्थिती असतानाही चांगला आणि यशस्वी खेळाडू होण्यासाठी आवश्यक गुण प्रविणमध्ये असल्याचे भुजबळ सरांनी हेरले. तो चपळ होता, अनेक क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी करायचा. प्रविण एक उत्तम खेळाडू होऊ शकतो याचा अंदाज भुजबळ सरांना आला. या मुलाची गरिबी दूर करायची असल्यास त्याला केवळ अभ्यासक्रमात गुंतवून न ठेवता, खेळांमध्ये लक्ष केंद्रित करायला लावल्यास त्याचे जीवन बदलेल आणि त्या माध्यमातून तो चांगली नोकरीसुद्धा मिळवू शकेल, असा भुजबळ सरांना विश्वास होता.

- Advertisement -

याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी प्रविणला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. प्रविणची पहिली समस्या होती ती म्हणजे पौष्टिक आहार. भुजबळ सरांच्या पत्नीने प्रविणच्या आहाराची जबाबदारी स्वीकारली. तो अधिक तंदुरुस्त झाल्यावर भुजबळ सरांनी राज्य सरकारने सुरु केलेल्या क्रीडा प्रबोधिनी योजनेमध्ये प्रविणचे नाव पुढे केले. प्रविणमध्ये चांगला ॲथलिट बनण्याची क्षमता आहे, तो चांगला धावपटू होऊ शकेल या विश्वासाने त्यांनी अमरावती येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रविणला प्रवेश मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि प्रविणला अखेर क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश मिळाला.

याच ठिकाणी प्रविणच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. शारीरिक तपासणी झाल्यावर तेथील निवड समितीने प्रविणच्या अंगविशेषांचा अभ्यास करून त्याला अ‍ॅथलेटिक्ससाठी नाही, तर धनुर्विद्या प्रशिक्षणासाठी निवडले. धावण्यामध्ये आपल्या जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या प्रविणचे धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात शिक्षण सुरु झाले. अमरावती येथील क्रीडा प्रबोधिनीतील प्रफुल्ल डांगे यांनी प्रविणला धनुर्विद्येचे प्राथमिक धडे दिले. त्याचे कौशल्य पाहून डांगे यांनी त्याला पुणे येथील प्रशिक्षक रणजीत चामले यांच्याकडे पाठवले. पुढे प्रविणला आर्मी इंस्टिट्यूट, पुणे येथे दाखल करण्यात आले. प्रविण आपल्या प्रत्येक गुरुकडून कौशल्य हस्तंगत करत होता.

वयाच्या १९ व्या वर्षी प्रविणने एशियाड स्पर्धांमध्ये कांस्यपदक मिळवले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. तो अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाला आणि चांगल्या कामगिरीच्या जोरावर पदके मिळवत गेला. वयाच्या २२ व्या वर्षी त्याने जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. पुढे टोकियो ऑलम्पिक स्पर्धेसाठी देशांतर्गत झालेल्या पात्रता स्पर्धेत प्रविण अव्वल ठरला आणि त्याचे टोकियोचे तिकीट निश्चित झाले.

आपल्या चिकाटी, आत्मविश्वास, निश्चय आणि कौशल्याच्या जोरावर टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा विश्वास प्रविणला आणि त्याच्या प्रशिक्षकांना आहे. प्रविण आता ऑलिम्पिकमध्ये कशी कामगिरी करतो याकडे महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रविण जेव्हा भारताच्या पथकासोबत संचालन करत तिरंग्याला वंदन करेल आणि स्पर्धेच्या वेळी इंडिया लिहिलेली जर्सी घालून आपल्या धनुष्याचा चाप ताणून धरेल, तेव्हा दूर एका खेड्यात ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये इतर ग्रामस्थांबरोबर ऑलिम्पिक पाहणाऱ्या विकास भुजबळ सर आणि त्यांच्या पत्नीला वाटणारा अभिमान काही वेगळाच असेल. प्रविणच्या या जिद्दीचे आणि त्याला भुजबळ सरांनी दिलेल्या प्रोत्साहनाचे कौतुक करावे तितके थोडेच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -