घरक्रीडाTokyo Olympics : 'भारतीय नारी सब पे भारी'! रौप्यपदक विजेत्या मीराबाईवर कौतुकाचा वर्षाव

Tokyo Olympics : ‘भारतीय नारी सब पे भारी’! रौप्यपदक विजेत्या मीराबाईवर कौतुकाचा वर्षाव

Subscribe

मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली. तिच्या या कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.

‘गजब. भारतीय नारी सब पे भारी,’ असे म्हणत भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमधील रौप्यपदक विजेत्या वेटलिफ्टर मीराबाई चानूचे अभिनंदन केले. या केवळ सेहवागच्या नाही, तर संपूर्ण भारताच्या भावना होत्या. मीराबाईला २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये एकही वजन उचलत आले नव्हते. त्यामुळे तिला बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले. पाच वर्षांनंतर मात्र आता चित्र पूर्णपणे वेगळे आहे. मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली. तिने एकूण २०२ किलोचे (८७+११५) वजन उचलत ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडले. तिच्या या कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.

‘पहिल्याच दिवशी पहिले पदक. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. मीरा तुझा देशाला अभिमान आहे,’ असे भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले. ‘टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे पहिले पदक जिंकल्याबद्दल मीराबाई चानूचे खूप अभिनंदन. तिची ही प्रेरणादायी कामगिरी अनेक वर्षे लोकांच्या लक्षात राहील आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. खूप शुभेच्छा,’ असे भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धांमधील एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्राने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisement -

तसेच भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सेहवागनेही मीराबाईचे कौतुक केले. ‘मीराबाई चानू. वेटलिफ्टिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी. दुखापतीनंतर तू तुझ्या खेळात बदल करून भारताला ज्याप्रकारे ऐतिहासिक रौप्यपदक जिंकवून दिलेस, त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. तुझा देशाला अभिमान आहे,’ असे सचिनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले. तसेच सेहवाग त्याच्या विशेष शैलीत मीराबाईचे कौतुक करताना म्हणाला, ‘गजब. भारतीय नारी सब पे भारी. मीराबाई चानू…हे नाव कायम लक्षात ठेवा. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून आम्हा सर्वांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्याबद्दल धन्यवाद.’

मणिपूरमध्ये जल्लोष 

मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकताच मणिपूरमध्ये तिचे कुटुंब आणि शेजारी राहणाऱ्या सर्वांनी जल्लोष केला. हे सर्व जण सकाळी उठून मीराबाईचा खेळ टीव्हीवर पाहत होते. ‘आम्हाला खूप आनंद झाला आहे. मीराने खूप मेहनत घेतली असून त्याचे तिला फळ मिळाले आहे. भारत आणि मणिपूरला तिचा अभिमान आहे,’ असे मीराबाईच्या नातेवाईकांनी सांगितले. मीराबाईच्या कामगिरीचे क्रीडा, मनोरंजन आणि राजकारण अशा सर्वच क्षेत्रातून कौतुक झाले.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -