घरताज्या घडामोडीपुरात भिजलेल्या वाहनांचा हायवेवर मुक्काम

पुरात भिजलेल्या वाहनांचा हायवेवर मुक्काम

Subscribe

महामार्गाचा वापर करण्यास कोणतीच पूर्वपरवानगी घेतलेली नाही

महाड शहरात आलेल्या महापुरात वाहनांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांची काही प्रमाणात दुरुस्ती, तर काही वाहने भंगारात काढली जात आहेत. खासगी वाहन विक्री आणि दुरुस्ती करणार्‍या गॅरेज मालकांनी ताब्यात घेतलेली वाहने खुलेआम महामार्गावर ठेवली आहेत. गेले महिनाभर ठेवण्यात आलेल्या वाहनांमुळे ये-जा करणार्‍या वाहनांना अडचण होत आहे. याबाबत महामार्ग बांधकाम विभाग आणि स्थानिक वाहतुक पोलीस हातावर हात ठेवून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जुलै महिन्यात आलेल्या पुरामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये नव्याने घेतलेल्या कार देखील भंगारात काढण्याची पाळी काहींवर आली आहे. अनेकांनी काबाडकष्ट करीत घेतलेली वाहने डोळ्यादेखत पुराच्या पाण्यात बुडाली. यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. याचा फायदा मात्र वाहन विक्रेते आणि दुरुस्ती करणार्‍यांनी करून घेतला आहे. वाहन विक्री करणार्‍या कंपन्यांनी सरसकट वाहने भंगारात काढून नवी वाहने घेण्यास पूरग्रस्तांना भाग पाडले आहे. यामुळे विम्याची मिळणारी रक्कम स्वीकारत पूरग्रस्तांनी आपली वाहने भंगारात काढत नवी वाहन नोंदणी केली.

- Advertisement -

सध्या जमा केलेली वाहने महामार्गावर बिनदिक्कत ठेवली आहेत. वाहन विक्रेत्यांनी महामार्ग म्हणजे आपली खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे या महामार्गाचा वापर करण्यास सुरुवात करून सर्व्हिस मार्गालगत ही वाहने उभी केली आहेत. तर काहींनी नव्याने सुरु असलेल्या महामार्गावर ही वाहने महामार्ग बांधकाम विभागाची पूर्वपरवानगी न घेताच ठेवली आहेत. सुरुवातीला दुकानांची साफसफाई सुरु असल्याने वाहने महामार्गावर ठेण्यास कोणाची मनाई नव्हती. मात्र आता पुरानंतर एक महिना उलटला असल्याने ही वाहने ज्या विक्रेत्यांनी ठेवली आहेत त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
मात्र महामार्ग बांधकाम विभाग आणि स्थानिक वाहतूक पोलीस हातावर हात ठेवून गप्प बसून आहेत.

निलेश ऑटोमोबाईल, भंडारी मोटर्स, सिमरन मोटर्स आदींनी आपली वाहने रस्त्यावर उभी केली आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. धारिया पेट्रोल पंप ते विसावा हॉटेलपर्यंत सर्व्हिस रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे ये-जा करणार्‍या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. नव्याने सुरू असलेल्या महामार्गावर विनापरवानगी वाहने गेले एक महिना उभी ठेवण्यात आली असल्याने महामार्ग बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

महामार्गावर ज्या खासगी वाहन विक्रेत्यांनी आणि गॅरेज मालकांनी पुरातील वाहने उभी केली आहेत त्यांनी वाहन पार्क करताना महामार्गाचा वापर करण्यास कोणतीच पूर्वपरवानगी घेतलेली नाही. लवकरच या सर्वांना नोटीस बजावल्या जातील.
– अमोल महाडकर, शाखा अभियंता, महामार्ग बांधकाम विभाग


हे ही वाचा – खुशखबर, ५ नोव्हेंबरपासून राज्यातील नाट्यगृह सुरू होणार


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -